“धुळ्यात संतापाचा स्फोट! धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्यावरून सकल मराठा समाज आक्रमक; गुन्हा दाखल न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा”

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे | प्रतिनिधी -
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कथित अवमानकारक वक्तव्य केल्याच्या आरोपावरून धुळे शहरात आज संतापाची लाट उसळली. प्रवचनकार धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला असून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करत प्रशासनाला थेट इशारा देण्यात आला.

“शिवरायांचा अपमान सहन केला जाणार नाही!” अशा कडक घोषणांनी परिसर दणाणून गेला. संतप्त कार्यकर्त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करताच, कार्यक्रम आयोजकांनाही जबाबदार धरून त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी ठाम भूमिका मांडली.
या आंदोलनादरम्यान शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनासमोर आपली भूमिका स्पष्ट करत गंभीर आरोप केले. नागपूर येथे एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत चुकीचा आणि अपमानास्पद संदर्भ जोडल्याचा आरोप करण्यात आला. या कथित वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शिवप्रेमी आणि बहुजन समाजात संतापाची ठिणगी पेटल्याचे त्यांनी सांगितले.
“हे वक्तव्य हेतुपुरस्सरच!” – समाजाचा आरोप
सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी हे वक्तव्य जाणीवपूर्वक करण्यात आले असल्याचा गंभीर आरोप करत महाराष्ट्रात धीरेंद्र शास्त्री यांच्यावर बंदी घालण्याची मागणी केली. “महापुरुषांचा अपमान म्हणजे समाजाच्या अस्मितेवर घाव आहे,” असे म्हणत त्यांनी प्रशासनाला कठोर कारवाईचा इशारा दिला.
उग्र आंदोलनाचा इशारा
“जर तात्काळ गुन्हा दाखल झाला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल,” असा थेट इशारा आंदोलकांनी दिला. दंगल घडवण्याचा प्रयत्न, समाजात अशांतता निर्माण करणे आणि महापुरुषांची बदनामी या गंभीर आरोपांखाली आयोजकांवरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.
कायदा करण्याचीही मागणी
या वेळी आंदोलकांनी एक पाऊल पुढे जात, छत्रपती शिवाजी महाराजांसह राजमाता जिजाऊ, संत तुकाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, अहिल्याबाई होळकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी विशेष कायदा करण्याचीही मागणी केली.
मोठ्या संख्येने उपस्थिती
या आंदोलनात भानुदास बगदे, सुधाकर बेंद्रे, विनोद जगताप, राजेंद्र काळे, निंबा मराठे, रणजीत भोसले, उल्हास यादव, संदीप पाटोळे, वीरेंद्र मोरे, भानुदास चौधरी, वामन मोहिते, सुरेश पवार, महेश गायकवाड, दीपक रौंदळ, संतोष लाकडे, मनोज रुईकर, सुलभाताई कुवर, नूतनताई पाटील, बाळासाहेब ठोंबरे, हेमंत जगदाळे, प्रफुल माने, नरेंद्र हेमाडे, गोविंद वाघ, कल्पेश नेरकर, देवेंद्र पवार, दिनेश चव्हाण, नितीन पाटील, वैभव पाटील, विक्रमसिंह काळे, अमर फरताडे यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते.
प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष
आता या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, पुढील काही दिवसांत परिस्थिती आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default