शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली सर्वसामान्य गुंतवणूकदारांना “मोठा नफा” आणि “दरमहा हमखास परतावा” देण्याचे गाजर दाखवत तब्बल 23 कोटींपेक्षा अधिक रकमेचा कथित आर्थिक घोटाळा उघडकीस आला असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार समजले जाणारे टीडब्ल्यूजे असोसिएट्स प्रा. लि. कंपनीचे संचालक समीर सुभाष नार्वेकर आणि नेहा समीर नार्वेकर या दाम्पत्याला जळगाव आर्थिक गुन्हे शाखेने अखेर अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना 29 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याने या प्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासानुसार, डिसेंबर 2020 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत टीडब्ल्यूजे कंपनीकडून जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठमोठे सेमिनार आयोजित करण्यात आले. या सेमिनारमध्ये शेअर मार्केटमधून कमी कालावधीत प्रचंड नफा मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात येत होते. “तुमचे पैसे काही महिन्यांत दुप्पट होतील”, “दरमहा ठरलेला परतावा मिळेल”, अशा आकर्षक दाव्यांनी अनेक गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढण्यात आल्याचा आरोप आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनीने कथितरीत्या सेबीच्या नियमांचे उल्लंघन करत गुंतवणूकदारांकडून तब्बल 23 कोटी 81 लाख 72 हजार 530 रुपये जमा केले. विशेष म्हणजे, या संपूर्ण व्यवहारात सुमारे 279 गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
“नफा”च्या स्वप्नातून थेट आर्थिक फटका
सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना परतावा देत विश्वास निर्माण करण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र, कालांतराने परताव्याची रक्कम थांबली. मुदत संपूनही पैसे परत न मिळाल्याने गुंतवणूकदारांनी चौकशी सुरू केली आणि अखेर संपूर्ण प्रकार समोर आला.
या प्रकरणी गुंतवणूकदार भरत रतीलाल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच संबंधित आरोपी फरार झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपास, आर्थिक व्यवहारांची छाननी आणि गुप्त माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवत अखेर नार्वेकर दाम्पत्याला अटक केली.
फ्रँचायझी चालक आधीच जेरबंद
या बहुचर्चित प्रकरणात यापूर्वीच जळगाव येथील फ्रँचायझी चालक आणि व्यवस्थापक मिलिंद पाटील यालाही अटक करण्यात आली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तपास यंत्रणांकडून आता कंपनीचे आर्थिक व्यवहार, बँक खात्यांतील उलाढाल, गुंतवणूकदारांकडून जमा झालेली रक्कम आणि ती नेमकी कुठे व कशी वळवण्यात आली याचा सखोल तपास सुरू आहे.
आर्थिक गुन्हे शाखेचा मोठा इशारा
या कारवाईनंतर आर्थिक गुन्हे शाखेने नागरिकांना मोठ्या परताव्याच्या आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. “हमखास नफा”, “शंभर टक्के परतावा”, “जोखीममुक्त गुंतवणूक” अशा दाव्यांमागे फसवणुकीचे जाळे असू शकते, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
गुंतवणूकदारांमध्ये संतापाची लाट
दरम्यान, आयुष्याची बचत आणि कष्टाची कमाई अडकलेल्या गुंतवणूकदारांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी आपली जमापुंजी, निवृत्तीवेतनाची रक्कम आणि कर्ज काढून केलेली गुंतवणूक अडकल्याने आर्थिक संकट उभे राहिले आहे.
या प्रकरणात आणखी काही एजंट, समन्वयक आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित व्यक्तींची नावे पुढे येण्याची शक्यता असून, आर्थिक गुन्हे शाखेकडून तपासाचा फास आणखी आवळला जात आहे.
(टीप : या प्रकरणातील आरोप हे पोलिस तपास आणि दाखल गुन्ह्याच्या आधारे असून न्यायालयीन निर्णय येणे बाकी आहे.)
— फुले शाहू आंबेडकर वृत्तपत्र
