“शामियान्यात पोलीसांची एंट्री अन् थांबला निकाह!”धुळ्यात १६ वर्षीय मुलीचा बालविवाह ऐनवेळी उधळला; डायल ११२ च्या एका कॉलने उघड केला धक्कादायक प्रकार

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे/ प्रतिनिधी: -  धुळे शहरातील शंभर फुटी रोड परिसर गुरुवारी रात्री अचानक पोलीस सायरनच्या आवाजाने दणाणून गेला आणि लग्नाच्या मंडपात सुरू असलेल्या आनंदसोहळ्याचे वातावरण काही क्षणांतच तणावात बदलले. सिमा हॉलमध्ये सुरू असलेल्या विवाह सोहळ्यावर चाळीसगाव रोड पोलिसांनी टाकलेल्या धाडसी

हस्तक्षेपामुळे एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह ऐनवेळी रोखण्यात आला. डायल ११२ वर आलेल्या एका गुप्त फोन कॉलमुळे संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली आणि पोलिसांनी थेट शामियान्यात प्रवेश करत कायद्याचा धाक दाखवला.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास डायल ११२ नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीने माहिती दिली की, शंभर फुटी रोडवरील सिमा हॉलमध्ये अल्पवयीन मुलीचा विवाह सुरू आहे. माहिती गंभीर स्वरूपाची असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वेगाने घटनास्थळी धाव घेतली.
विवाहस्थळी पोहोचताच पोलिसांनी थेट वधू-वर पक्षाची चौकशी सुरू केली. सुरुवातीला लग्नसोहळ्यातील उपस्थितांमध्ये मोठी खळबळ उडाली. चौकशीत मुलीचे वडील अब्दुल कैस अब्दुल हक शाह यांनी विवाह सुरू असल्याची कबुली दिली. वर अफजल शाह मुस्तफा शाह (वय २२, रा. मालेगाव) असल्याची माहिती समोर आली.
यानंतर पोलिसांनी वधूच्या वयाची अधिकृत कागदपत्रे तपासली आणि धक्कादायक सत्य समोर आले. मुलीचे वय केवळ १६ वर्षे ३ महिने १५ दिवस असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हा विवाह बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार बेकायदेशीर ठरत असल्याचे पोलिसांनी दोन्ही कुटुंबीयांना स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतात, असा इशाराही देण्यात आला.
कायद्याचा कठोर इशारा आणि पोलिसांची ठाम भूमिका पाहून अखेर दोन्ही कुटुंबीयांनी माघार घेत विवाह स्थगित करण्यास सहमती दर्शवली. त्यांनी लेखी निवेदन देत मुलगी सज्ञान होईपर्यंत विवाह पुढे ढकलण्यात येत असल्याचे नमूद केले. त्यामुळे ऐनवेळी संभाव्य गंभीर गुन्हा रोखण्यात पोलिसांना यश आले.
या कारवाईनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले. “आपल्या परिसरात कुठेही अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवा. समाजाच्या सतर्क सहभागाशिवाय बालविवाहासारख्या सामाजिक गुन्ह्यांवर आळा घालणे अशक्य आहे,” असे त्यांनी सांगितले.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे यांच्यासह शरद जाधव, धिरज सांगळे आणि प्रमोद खैरनार यांनी सक्रिय सहभाग घेतला.
काय सांगतो कायदा?
बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार मुलीचे किमान विवाहयोग्य वय १८ वर्षे आणि मुलाचे २१ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. अल्पवयीन विवाह लावणे, त्यास मदत करणे किंवा प्रोत्साहन देणे हा दंडनीय गुन्हा मानला जातो. अशा प्रकरणांत संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default