जैताणे/साक्री, धुळे जिल्हा : शिरपूर येथील दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच धुळे जिल्ह्यात आणखी एका दुहेरी हत्याकांडाने भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. साक्री तालुक्यातील वर्धाने व उभरांडी शिवारात एका विवाहित महिलेसह तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात स्वतःला ‘महाराज’ म्हणवून घेणाऱ्या भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली आहे. अघोरी पूजा, अंधश्रद्धा आणि पैशांच्या वादातून हा रक्तरंजित प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री काकुस्ते (वय २५) या विवाहित महिलेचा मृतदेह भडगाव-वर्धाने टेंभे फाट्याजवळ संशयास्पद अवस्थेत आढळून आला. तिच्या अंगावर दुचाकी टाकण्यात आली होती, तर तोंड रुमालाने बांधलेले होते. घटनास्थळी मोबाईल फोन, पर्स आणि इतर साहित्य सुरक्षित अवस्थेत आढळल्याने हा प्रकार लुटीसाठी नसून नियोजित कटाचा भाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
जयश्री या खासगी कंपनीत कलेक्शनचे काम करत होत्या. त्या अचानक बेपत्ता झाल्यानंतर निजामपूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान योगेश उर्फ भैय्या खैरनार याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली.
चौकशीत योगेश खैरनार याने अक्षय सोनवणे (वय २८) या तरुणाची लोखंडी रॉडने हत्या करून मृतदेह टेकडी परिसरात पुरल्याची कबुली दिल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश हा उभरांडी रस्त्यालगत एका मठात वास्तव्य करत होता. तो स्वतःला ‘महाराज’ म्हणवत गुढ्या पाहून भविष्य सांगणे, अघोरी पूजा, समस्या दूर करण्याचे दावे करत लोकांना आपल्या जाळ्यात ओढत होता. मृत जयश्री आणि अक्षय हे दोघेही त्याच्या संपर्कात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
विशेष म्हणजे शनि अमावस्येच्या पार्श्वभूमीवर अघोरी पूजा आणि काही गुप्त विधी सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगली होती. त्याच दरम्यान पैशांचे व्यवहार, संशय आणि वादातून हे दुहेरी हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक पथक, डॉग स्क्वॉड आणि तांत्रिक तपास पथकाच्या मदतीने पुरावे गोळा केले आहेत.
या प्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत खून, पुरावे नष्ट करणे, फसवणूक आणि कट रचणे यासंबंधी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्राथमिक स्वरूपात कलम १०३(१) (खून), २३८ (पुरावे नष्ट करणे), ६१(२) (गुन्हेगारी कट) आदी गंभीर कलमांचा समावेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अधिकृत पुष्टी पोलिस तपासानंतरच होणार आहे.
दरम्यान, धुळे जिल्ह्यात अवघ्या काही दिवसांत उघडकीस आलेल्या सलग दुहेरी हत्याकांडांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या भोंदूगिरीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद हालचाली किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या प्रकारांची तातडीने माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

