या खळबळजनक प्रकरणामुळे पुणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून, “कायद्याचे रक्षकच खंडणीखोर बनले का?” असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
जिममधील ओळख ठरली कटकारस्थानाची सुरुवात
तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित युवतीची ओळख शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दामिनी पथकात कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपाई सोनाली हिंगेशी एका जिममध्ये झाली होती. नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत हिंगेने युवतीला विश्वासात घेतले. त्यानंतर युवतीचा वापर करून प्राचार्यांविरुद्ध बाल लैंगिक अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली.
“पोक्सो”सारख्या गंभीर कायद्याचा धाक दाखवत संबंधित प्राचार्यांना मानसिक दबावाखाली आणण्यात आले. बदनामी, अटक आणि करिअर उद्ध्वस्त होण्याच्या भीतीतून अखेर प्राचार्यांकडून लाखो रुपयांची रक्कम उकळण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
प्रवेशाचे आमिष, नंतर फसवणूक
धक्कादायक बाब म्हणजे, युवतीला प्रत्यक्षात संबंधित महाविद्यालयात प्रवेशही मिळवून देण्यात आला नाही. तिने दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेतला; मात्र तेथील प्रवेशही नंतर रद्द झाल्याचे समोर आले. स्वतःची फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यानंतर युवतीने कुटुंबीयांसह थेट पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला.
पोलीस आयुक्तांची कठोर कारवाई
या गंभीर प्रकाराची दखल घेत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी संबंधित तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना तत्काळ सेवेतून बडतर्फ केले. बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध खंडणी आणि अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा नोंद होताच तिघेही फरार झाले होते. अखेर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने सापळा रचून अजित बडे आणि सुदाम तायडे यांना शुक्रवारी अटक केली.
फरार असलेल्या सोनाली हिंगेचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली असून, तपास अधिक खोलात सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.
दोन वर्ष पोलिसांना गुंगारा; आर्थिक फसवणुकीतील आरोपी नवी मुंबईत जेरबंद
दरम्यान, पुण्यातील चंदननगर पोलिसांनी आर्थिक फसवणुकीच्या दुसऱ्या एका प्रकरणात दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला नवी मुंबईतून अटक केली आहे.
दत्तात्रय बबन तावरे (वय ३७, रा. कोल्हेवाडी, ता. कराड, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
तक्रारदाराकडून कुक्कुटपालन व्यवसायासाठी ५० हजार रुपये उसने घेतल्यानंतर आरोपीने विश्वास संपादन केला. त्यानंतर “पत्नीला कार्यक्रमाला जायचे आहे” असे सांगत फिर्यादीच्या पत्नीचे मंगळसूत्र तीन दिवसांसाठी मागून घेतले. मात्र, ते परत करण्याऐवजी आरोपीने ते थेट एका वित्तीय संस्थेत गहाण ठेवले.
फसवणूक उघड होताच चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात आरोपीने अशाच पद्धतीने आणखी तिघांना गंडा घातल्याचे स्पष्ट झाले.
मोबाईल बंद, बँक खातेही थांबवले; तरी पोलिसांनी शोधला ठावठिकाणा
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी तब्बल दोन वर्षे फरार होता. त्याने मोबाईल क्रमांक बदलला, बँक व्यवहार बंद केले आणि सतत ठिकाण बदलत पोलिसांना चकवा दिला. मात्र, तांत्रिक तपासाच्या आधारे तो नवी मुंबईतील सानपाडा परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.
पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश बडाख, सहायक निरीक्षक महेश लामखेडे, गणेश जगदाळे, किरण घुटे आणि विक्रम गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
