केज | प्रतिनिधी
“दुबईहून टॅक्स चुकवून आणलेले स्वस्त सोन्याचे बिस्कीट”... या आमिषाला भुलून लाखोंची रोकड घेऊन आलेल्या एका सोनारावर चोरट्यांनी जीवघेणा हल्ला करत तब्बल तीन लाख रुपयांची लूट केल्याची धक्कादायक घटना केज येथे उघडकीस आली आहे. मात्र, लूट करून भरधाव वेगाने पसार होत असताना चोरट्यांच्या मोटारसायकलीचा भीषण अपघात झाल्याने दोन संशयित जखमी अवस्थेत पोलिसांच्या हाती लागले, तर त्यांच्या इतर साथीदारांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला.
ही थरारक घटना शनिवारी (दि.१७ मे) दुपारी साडेतीनच्या सुमारास केज शहराजवळील उमरी फाट्याजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून “स्वस्त सोनं” दाखवून नागरिकांना जाळ्यात ओढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव तालुक्यातील टाकरवन येथील सोन्या-चांदीचे व्यापारी दत्ता काकडे यांना सोशल मीडियावरून एका व्यक्तीने संपर्क साधला होता. मैत्री वाढल्यानंतर संबंधिताने “दुबईहून आणलेले सोन्याचे बिस्कीट बाजारभावापेक्षा खूप कमी दरात मिळेल” असे सांगत त्यांना केज येथे बोलावले. मोठा फायदा होणार या अपेक्षेने दत्ता काकडे हे त्यांचे कारागीर सतीश दीक्षित यांच्यासह लाल रंगाच्या किया कारमधून तीन लाख रुपयांची रोकड घेऊन केज येथे पोहोचले.
दरम्यान, सोशल मीडियावर ओळख झालेला संशयित आणि त्याचा साथीदार यांनी काकडे यांना बीड रोडवरील उमरी फाट्याजवळील गंगा माऊली साखर कारखाना परिसरातील निर्जन जागी नेले. सुरुवातीला सोन्याचा व्यवहार दाखविण्याचा बहाणा करण्यात आला. मात्र काही क्षणांतच परिस्थिती बदलली.
सतीश दीक्षित यांच्या हातातील पैशांची पिशवी हिसकावून घेत चोरट्यांनी पळ काढला. विरोध करण्याचा प्रयत्न करताच एका संशयिताने लोखंडी रॉडने सोनाराच्या पाठीवर वार करून त्यांना जखमी केल्याचे सांगण्यात आले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात गोंधळ उडाला.
आरडाओरड आणि गावकऱ्यांचा पाठलाग
लूट झाल्यानंतर दत्ता काकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्याने आरडाओरड केली. आवाज ऐकून परिसरातील नागरिक धावत घटनास्थळी पोहोचले. नागरिक येताना दिसताच चोरट्यांनी शेतातून आणि रस्त्याने पळण्याचा प्रयत्न केला.
यावेळी दोन संशयित मोटारसायकलवरून भरधाव वेगाने केजच्या दिशेने पळत होते. जमाव पाठलाग करत असल्याने घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी वेग वाढवला आणि समोरून येणाऱ्या एका इंडिका कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही संशयित गंभीर जखमी झाले.
जखमी अवस्थेत पकडण्यात आलेल्या संशयितांची नावे आप्पा शिवाजी शिंदे आणि विशाल रामकिसन शिंदे अशी असून ते धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मांडवा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यावर केज उपजिल्हा रुग्णालयात पोलिस बंदोबस्तात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी चाकू आणि केबल वायर
अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी पंचनामा करताना तेथून एक धारदार चाकू तसेच केबल वायरचा बंच जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही टोळी केवळ लुटीसाठी नव्हे तर गंभीर गुन्ह्याच्या तयारीनेच आली होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
स्थानिक नागरिकांनी वेळीच पाठलाग केल्यामुळे दोन संशयित पकडले गेले; अन्यथा संपूर्ण टोळी पसार झाली असती, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.
थोडक्यात सोनाराचा जीव बचावला
या प्रकारातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, लुटीला विरोध केल्यावर अनेकदा जीवघेणे हल्ले होतात. येथेही लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. घटना दिवसाढवळ्या घडल्यामुळे आणि नागरिक तत्काळ धावून आल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे. अन्यथा प्राणघातक हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
अपघातात इंडिका कारचेही नुकसान
संशयितांनी धडक दिलेली इंडिका कार येळंब येथील बबन वंजारे यांची असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या मित्रांना घेण्यासाठी ते केजकडे येत असताना हा अपघात घडला. या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले.
पोलिसांची धावपळ
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम यांच्यासह पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी संशयितांना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. फरार साथीदारांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
“सोने किंवा महागड्या वस्तू बाजारभावापेक्षा अत्यंत कमी दरात देण्याचे आमिष दाखवून फसवणूक आणि लूट करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. अशा व्यवहारांपासून नागरिकांनी सावध राहावे. संशयास्पद हालचालींची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी,” असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे यांनी केले आहे.

