अनैतिक संबंध, विश्वासघात, सुपारी, आणि थरकाप उडवणारे हत्याकांड… गुजरातमधील सुरेंद्रनगर येथे उघडकीस आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. पती आड येत असल्याच्या संशयातून एका महिलेने तब्बल चार वेगवेगळ्या पुरुषांच्या मदतीने स्वतःच्या पतीचा काटा काढल्याचा आरोप समोर आला आहे. तब्बल आठ महिने ‘अपघाती मृत्यू’ समजल्या गेलेल्या या प्रकरणाचा पर्दाफाश अखेर अहमदाबाद क्राईम ब्रांचने केला असून, तपासातील प्रत्येक तपशील अंगावर काटा आणणारा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला जागृती गोस्वामी (वय ५०) हिने तिचा निकटचा साथीदार कांतिलाल उर्फ भरत साबरिया याच्यासोबत मिळून पती शांतीगिरी गोस्वामी यांची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आणखी काही व्यक्तींचा वापर करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
दिरासोबत घर सोडून दुसरे आयुष्य सुरू… पण तिथेही ‘प्रेमाचे नवे अध्याय’
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, जागृतीचे पहिले लग्न सुखदेवगिरी गोस्वामी यांच्याशी झाले होते. त्यांना दोन मुलेही होती. मात्र, काही वर्षांतच जागृतीचे संबंध तिच्याच दिराशी म्हणजे पतीच्या मोठ्या भावाशी जुळल्याची माहिती समोर आली. त्यानंतर ती दोन मुलांना मागे सोडून शांतीगिरीसोबत निघून गेली आणि दोघांनी नवीन संसार थाटला.
शांतीगिरी व्यवसायाने ट्रक चालक असल्याने तो अनेक दिवस बाहेर असायचा. त्याच काळात जागृतीचे संबंध शेजारी राहणाऱ्या कांतिलालशी जुळल्याचा आरोप आहे. हळूहळू हे संबंध इतके वाढले की, दोघांसाठी शांतीगिरी अडथळा ठरू लागला.
२५ हजारांची सुपारी… पण ‘किलर’च झाला गायब!
तपास यंत्रणेनुसार, पतीला हटवण्यासाठी आरोपींनी एका सराईत गुन्हेगाराला २५ हजार रुपयांची सुपारी दिली होती. संबंधित व्यक्ती रात्री घरात पोहोचलीही; मात्र हत्या करण्याचे धाडस झाले नाही. त्याने झोपलेल्या शांतीगिरीचा फोटो काढून “काम झाले” असा बनाव केला आणि पैसे घेऊन फरार झाल्याचे समोर आले.
दुसऱ्याच दिवशी शांतीगिरी घराबाहेर निवांत चहा पिताना दिसताच आरोपींची झोप उडाली. त्यानंतर कथितरीत्या स्वतःच हत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
उशीने दाबले तोंड, गळा आवळत बेडवरच संपवला जीव
पोलिसांच्या तपासानुसार, संधी साधून आरोपींनी घरातच शांतीगिरीवर हल्ला केला. एका आरोपीने त्याचा गळा आवळला, तर महिलेने उशीने तोंड आणि नाक दाबून ठेवले. काही मिनिटांतच शांतीगिरीचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह घरात लपवून ठेवण्यात आला.
हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आणखी एका व्यक्तीला बोलावण्यात आले. कारच्या मदतीने मृतदेह दूर नेऊन नाल्यात टाकण्यात आल्याचा आरोप आहे, जेणेकरून हा प्रकार अपघात वाटावा.
“नोकरीसाठी बाहेर गेला…” अफवांनी गावाची दिशाभूल
हत्यानंतर संशय टाळण्यासाठी शांतीगिरी बाहेरगावी नोकरीसाठी गेला असून त्याचा मोबाईल नंबर बदलला आहे, अशी माहिती गावात पसरवण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. अनेक महिने कुटुंबीय आणि गावकऱ्यांची दिशाभूल करण्यात आली.
दरम्यान, गेल्या वर्षी सापडलेल्या मृतदेहाची नोंद सुरुवातीला अपघाती मृत्यू म्हणून करण्यात आली होती. मात्र, अहमदाबाद क्राईम ब्रांचला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर तपासाची दिशा बदलली. सलग दोन महिन्यांच्या तपासानंतर अखेर या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले.
पहिल्या पतीचे ‘मोठे मन’ चर्चेत
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात भावनिक बाजू म्हणजे जागृतीचा पहिला पती सुखदेवगिरी. पोलिस सूत्रांनुसार, तो आजही स्वतःच्या दोन मुलांसह जागृती आणि शांतीगिरीच्या मुलाचाही सांभाळ करत आहे. एका बाजूला गुन्हेगारी कटाची काळी कहाणी, तर दुसऱ्या बाजूला जबाबदारीची ही शांत भूमिका… यामुळे हे प्रकरण अधिक चर्चेत आले आहे.
पोलिस तपास सुरू; आरोपी कोठडीत
सध्या या प्रकरणातील मुख्य आरोपी महिला आणि तिचा कथित साथीदार पोलिस कोठडीत असून, इतर संबंधित व्यक्तींची भूमिकाही तपासली जात आहे. पोलिसांकडून आर्थिक व्यवहार, कॉल रेकॉर्ड, आणि मृतदेह विल्हेवाटीच्या संपूर्ण साखळीचा तपास सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे गुजरातमध्ये मोठी खळबळ उडाली असून, “विश्वास, संबंध आणि गुन्हेगारी” यांचा काळा संगम पुन्हा एकदा समोर आला आहे.

