पुणे | प्रतिनिधी
पुणे शहरातील वाढत्या टोळीयुद्धाने पुन्हा एकदा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी आकाश मस्के याचा भाऊ बाळा मस्के याची भरदिवसा गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याने शहर हादरलं आहे. या हल्ल्यामागे जुने वैर, टोळी संघर्ष आणि सूडाची भावना असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळच्या सुमारास पुण्यातील बालाजीनगर बसस्टॉप परिसरात ही थरारक घटना घडली. बाळा मस्के हा परिसरातून जात असताना काही हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. प्रथम त्याच्यावर जवळून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर हल्लेखोरांनी कोयत्याने सपासप वार करत त्याला रक्ताच्या थारोळ्यात सोडून घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती समोर येत आहे.
भर रस्त्यात झालेल्या या रक्तरंजित हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून काही काळ परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. घटनेनंतर स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी, फॉरेन्सिक पथक आणि मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला.
प्राथमिक तपासात हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आंदेकर आणि कोमकर गटातील संघर्ष मागील काही वर्षांपासून पुण्यात चर्चेचा विषय ठरला आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये नाना पेठ परिसरात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्या घटनेनंतर शहरातील टोळीयुद्ध अधिक तीव्र झाल्याचं बोललं जात होतं.
यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर याची हत्या झाली होती. आता बाळा मस्केच्या खुनामुळे पुन्हा एकदा या टोळीयुद्धाने हिंसक वळण घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. सलग घडणाऱ्या या रक्तरंजित घटनांमुळे पुणे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, पोलिसांकडून घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणातील नेमकं कारण, आरोपींची ओळख आणि टोळी संघर्षाचा संबंध याबाबत पोलीस अधिकृत तपास करत आहेत.
पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.

