शिंदखेडा / प्रतिनिधी - नाशिक शहरात “लग्न जमवून देतो” असे आमिष दाखवत तरुणांना जाळ्यात ओढून लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या महिला टोळीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विवाहाच्या नावाखाली विश्वास संपादन करून पैशांची उकळपट्टी करणाऱ्या या टोळीविरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आतापर्यंत चार महिलांना अटक केली आहे.
या प्रकरणामुळे विवाह संस्थेच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीच्या काळ्या बाजाराचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले असून, ग्रामीण भागातील अविवाहित तरुणांना लक्ष्य करून ही टोळी कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वायपूर येथील रहिवासी बळवंत साहेबराव पाटील यांनी ३० मार्च रोजी मुंबई नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, विवाह जुळवून देण्याचे आमिष दाखवत काही महिलांनी त्यांच्याशी संपर्क साधला. विश्वास निर्माण केल्यानंतर लग्नासाठी विविध कारणे पुढे करत मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी करण्यात आली.
फिर्यादीकडून लाखो रुपये उकळल्यानंतर संबंधित महिलांनी संपर्क तोडल्याचे समोर आले. संशय निर्माण झाल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघड झाला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत कारवाई केली आणि या रॅकेटमधील चार महिलांना ताब्यात घेतले.
तपासादरम्यान या टोळीने केवळ एकाच व्यक्तीला नव्हे, तर अनेक तरुणांना विवाहाच्या आमिषाने लक्ष्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. काही महिलांकडून बनावट ओळखी, खोटे नातेवाईक आणि बनावट विवाह चर्चा उभ्या करून आर्थिक व्यवहार केल्याची माहितीही समोर येत आहे.
या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या संशयित महिलांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना २१ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या फसवणूक रॅकेटमध्ये आणखी काही एजंट, मध्यस्थ आणि साथीदार सहभागी असल्याचा संशय असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
मुंबई नाका पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, अशाच प्रकारे फसवणूक झालेल्या इतर नागरिकांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
“लग्न” की “लूट”?
विश्वास, नातं आणि संसाराची स्वप्नं दाखवत आर्थिक फसवणूक करणाऱ्या या टोळीने समाजात मोठी खळबळ उडवली आहे. विवाहाच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा गुन्हेगारी टोळ्यांमुळे सर्वसामान्य कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता या प्रकरणातून आणखी किती धक्कादायक खुलासे होतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

