शिरपूरमध्ये ‘दारूचा काळाबाजार’ उघड! घरातच सुरू होता बनावट दारूचा कारखाना; पोलिसांच्या धाडीत लाखोंचा साठा जप्त

फुले शाहू आंबेडकर
0

शिरपूर : शिरपूर तालुक्यातील चांदसुर्या गावात सुरू असलेल्या बनावट देशी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर शिरपूर शहर पोलिसांनी धडक कारवाई करत संपूर्ण कारखानाच उद्ध्वस्त केला. घराच्या तळमजल्यापासून थेट पहिल्या मजल्यावरील किचनपर्यंत बनावट दारू तयार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या कारवाईत तब्बल ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात बनावट दारू निर्मितीचे जाळे सक्रिय असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना मिळाली होती. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अशा बेकायदेशीर कारखान्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.

या आदेशानंतर शिरपूर शहर पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने चांदसुर्या गावात सापळा रचत छापा टाकला. छाप्यादरम्यान नितेंद्र पोपटराव पावरा हा स्वतःच्या घरामध्येच बनावट ‘टँगो पंच’ देशी दारू तयार करत असल्याचे उघड झाले.

पोलिसांनी घराची कसून झडती घेतली असता, तब्बल ४३५ लिटर स्पिरीट, ‘टँगो पंच’चे स्टिकर्स लावण्यासाठी तयार ठेवलेल्या २२ हजार रिकाम्या बाटल्या, दारू सीलबंद करण्यासाठी वापरले जाणारे मशीन, बुच, बनावट लेबले आणि इतर साहित्य असा मोठा साठा आढळून आला. या साहित्याचा वापर करून मोठ्या प्रमाणावर बनावट दारू बाजारात पाठविण्याची तयारी सुरू असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

विशेष म्हणजे, साध्या निवासी घरामध्येच हा संपूर्ण कारखाना सुरू असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. बनावट दारूमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची चर्चा गावात रंगली असून, या रॅकेटमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू करण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३ तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५ (क), (ड), (इ), (फ), ८१ आणि ८३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या बनावट दारू नेटवर्कचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default