चोपडा | प्रतिनिधी
चोपडा शहरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून जेरबंद केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. कान्हा वॉशिंग सेंटर परिसरात संशयास्पद हालचाली करत फिरणाऱ्या २० वर्षीय तरुणाच्या ताब्यातून गावठी कट्टा, जिवंत काडतूस आणि मोबाइल असा तब्बल १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २१ मे रोजी चोपडा शहरातील कान्हा वॉशिंग सेंटर परिसरात एक तरुण प्राणघातक बेकायदेशीर शस्त्र घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक पवन देसले यांना मिळाली होती. माहिती अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश देत विशेष पथक तयार केले. पंचांसह पोलिस पथकाने परिसरात सापळा रचत संशयिताचा शोध सुरू केला.
दरम्यान, मुस्लिम कब्रस्तानाजवळ बातमीदाराने दिलेल्या वर्णनाशी मिळताजुळता तरुण संशयास्पद हालचाली करताना पोलिसांना दिसून आला. पोलिस पथक जवळ येत असल्याचे लक्षात येताच संबंधित तरुणाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. काही क्षण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, पोलिस कॉन्स्टेबल जगन्नाथ पाटील आणि नीलेश वाघ यांनी प्रसंगावधान राखत जीवाची पर्वा न करता त्या तरुणाचा थरारक पाठलाग केला आणि अखेर त्याला शिताफीने पकडून ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपले नाव दुर्गेश दिवाण पाटील असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि मोबाइल फोन असा एकूण अंदाजे १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शहरात बेकायदेशीर शस्त्रांचा वाढता वावर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल नीलेश वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिस ठाण्यात संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून आरोपीकडे शस्त्र कुठून आले, त्याचा वापर कोणत्या उद्देशाने केला जाणार होता तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचे जाळे आहे का, याचाही सखोल तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
या पथकाने बजावली महत्त्वाची भूमिका
ही धडक कारवाई पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक एकनाथ भिसे, सहाय्यक फौजदार दीपक विसावे, पोलिस हवालदार संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, संदीप भोई तसेच पोलिस कॉन्स्टेबल जगन्नाथ पाटील, विनोद पाटील, आकाश पाटील आणि नीलेश वाघ यांच्या पथकाने कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.

