“घर खाली करा नाहीतर नवऱ्याला विहिरीत फेकून ठार करू” — नाशिक हादरलं! भाजप नगरसेवकासह तिघांवर गंभीर गुन्हा दाखल

फुले शाहू आंबेडकर
0
जमिनीच्या वादातून महिलेला धमक्या, अश्लील वर्तन आणि जीवे मारण्याची धमकी; उपनगर पोलिस ठाण्यात खळबळजनक गुन्हा
नाशिक : कायद्याचे राज्य आणि सुरक्षित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्येच आता सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेला राहते घर आणि शेजारील भूखंड 

जबरदस्तीने खाली करण्यासाठी धमक्या देणे, अश्लील शिवीगाळ करणे, तसेच तिच्या पतीला विहिरीत फेकून ठार मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप भाजपच्या विद्यमान नगरसेवकासह तिघांवर करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातही चर्चा रंगल्या आहेत.
या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात प्रभाग क्रमांक 17 चे नगरसेवक प्रशांत अशोक दिवे, वसंत गुलाब पाटील आणि प्रशांत गुलाब पाटील यांच्या विरोधात विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिला ही सिद्धेश्वर नगर, जुना सायखेडा रोड, जेलरोड परिसरातील रहिवासी असून तिने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
190 वाराच्या भूखंडासाठी दबाव? महिलेला सतत मानसिक छळ
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, महिलेच्या राहत्या घराशेजारी सुमारे 190 वाराचा मोकळा प्लॉट आहे. या भूखंडावर ताबा मिळवण्यासाठी संशयितांकडून वारंवार दबाव आणला जात होता. महिलेला आणि तिच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास देऊन त्यांनी वैतागून जागा रिकामी करावी, हा उद्देश असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
पीडित महिलेने यापूर्वीही संबंधितांविरोधात शिवीगाळ, दमदाटी आणि अश्लील वर्तनाबाबत पोलिसांत तक्रार दिली होती. काही दिवस वातावरण शांत राहिल्यानंतर पुन्हा धमक्यांचा सिलसिला सुरू झाल्याचे समोर आले आहे.
“तुझ्या नवऱ्याला विहिरीत फेकून मारून टाकू” — विहिरीजवळ अडवून धमकी
सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास संबंधित महिला किराणा सामान घेऊन घरी परतत होती. त्यावेळी कॉलनीतील विहिरीजवळ तिला अडवण्यात आल्याचा आरोप आहे. फिर्यादीनुसार, वसंत गुलाब पाटील याने महिलेला थांबवत धमकी दिली की, “आता किती दिवस त्रास सहन करणार? नगरसेवक प्रशांत दिवे आणि माझा भाऊ प्रशांत पाटील यांनी सांगितलं आहे, घर आणि प्लॉट खाली केला नाही तर तुझ्या नवऱ्याला याच विहिरीत फेकून मारून टाकू.”
इतक्यावरच न थांबता महिलेशी अश्लील हावभाव करून तिला जबरदस्तीने जवळ ओढण्याचाही आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
“नगरसेवकाची दहशत होती” — उशिरा तक्रार दाखल
फिर्यादी महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, संबंधित नगरसेवकाची परिसरात दहशत असल्यामुळे यापूर्वी तक्रार करण्यास ती घाबरत होती. मात्र वाढता त्रास आणि कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर अखेर तिने पोलिस ठाणे गाठले.
उपनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक साक्षीदारांचे जबाब आणि पूर्वीच्या तक्रारींची पडताळणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकप्रतिनिधींवरच गंभीर आरोप; नागरिकांमध्ये संताप
ज्यांच्याकडे नागरिकांच्या सुरक्षेची आणि न्यायाची जबाबदारी आहे, त्यांच्यावरच दबाव टाकणे, धमक्या देणे आणि जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप झाल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे. “जर सामान्य महिलेलाच अशा प्रकारे धमकावले जात असेल, तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा?” असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणामुळे नाशिकमधील वाढत्या भूखंड वादांचा आणि राजकीय दबावाच्या कथित प्रकारांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default