म्हसावद पोलिसांचा दारू माफियांवर घणाघात !रात्रीच्या अंधारात पिकअप टाकून चालक फरार; ५६ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त

फुले शाहू आंबेडकर
0

म्हसावद | प्रतिनिधी ; -  
शहादा तालुक्यातील म्हसावद परिसरात अवैध दारू तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत दारू माफियांचे धाबे दणाणून सोडले आहेत. स्थानिक गुन्हे शाखा आणि म्हसावद पोलिसांनी संयुक्तरीत्या राबवलेल्या कारवाईत तब्बल ५६ लाख ४४ हजार ४८० रुपयांचा अवैध दारूसाठा आणि पिकअप वाहन जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे अवैध दारू तस्करीच्या साखळीवर मोठा आघात झाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त सूत्रांकडून माहिती मिळाली होती की, म्हसावद ते तोरणमाळ मार्गावरून पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनातून मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची वाहतूक केली जाणार आहे. माहितीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने कारवाईची रणनीती आखत राणीपूर परिसरात सापळा रचला.
रात्री साडेआठच्या सुमारास संशयित पिकअप वाहन वेगाने येताना दिसताच पोलिसांनी पाठलाग सुरू केला. मात्र पोलिसांचा वाढता दबाव पाहून चालक आणि क्लिनर यांनी वाहन रस्त्यावरच सोडून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले. पोलिसांनी तत्काळ वाहन ताब्यात घेत तपासणी केली असता वाहनामध्ये मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या अवैध दारूच्या पेट्या आढळून आल्या.
या कारवाईत अवैध दारूसाठ्यासह पिकअप वाहन असा एकूण ५६ लाख ४४ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी चौघांविरोधात म्हसावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, राज्यात अवैध दारू तस्करी रोखण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क असल्याचा हा मोठा संदेश मानला जात आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांचा वापर करून सुरू असलेल्या दारू तस्करीच्या नेटवर्कवर पोलिसांनी थेट प्रहार केल्याने तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, जितेंद्र पाडवी, सजन वाघ, रामेश्वर पाटील, मोहन दमडे, सुनील येवले, सचिन वसावे, पुरुषोत्तम सोनार, यशदीप ओगले आणि राजेंद्र काटके यांच्या विशेष पथकाने केली.
दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईचे परिसरातून स्वागत होत असून, अवैध धंद्यांविरोधात अशाच कठोर मोहिमा सातत्याने राबवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default