जळगाव | प्रतिनिधी
जळगाव तालुका पोलिसांनी निमखेडी रोड परिसरात सुरू असलेल्या कथित कुंटणखान्यावर टाकलेल्या धडक छाप्यानंतर एक धक्कादायक आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले आहे. पोलिसांच्या तपासात संबंधित प्रकरणातील एका महिलेचे बांगलादेशाशी संबंध असल्याचे उघड झाले असून, तिच्याकडे असलेले आधार कार्डही बनावट असल्याचे बायोमेट्रिक पडताळणीत निष्पन्न झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
तालुका पोलिसांनी २१ मे रोजी निमखेडी रोडवरील ब्रम्हांडनायक अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या कथित अनैतिक व्यवसायावर छापा टाकत सागर सोनवणे (रा. धरणगाव) आणि सीमा उर्फ कविता मोरे (रा. जळगाव) यांच्याविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या कारवाईत दोन महिलांची सुटका करून त्यांना संरक्षणासाठी आशादीप संस्थेत दाखल करण्यात आले होते.
मात्र, पुढील तपासात पोलिसांना एका महिलेबाबत संशय निर्माण झाला. तिची भाषाशैली, हालचाली, ओळख सांगताना होणारी टाळाटाळ आणि सतत बदलणारी माहिती यामुळे पोलिसांनी अधिक सखोल चौकशी सुरू केली. सुरुवातीला ती स्वतःची खरी ओळख लपवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपासाचा आधार घेत तिच्या मोबाईलमधील माहिती तपासली असता काही परदेशी क्रमांक, संशयास्पद संपर्क आणि वेगवेगळ्या नावांनी सेव्ह केलेली माहिती समोर आली.
यानंतर पोलिसांनी तिच्या कागदपत्रांची बायोमेट्रिक पडताळणी केली असता तिच्याकडे असलेले आधार कार्ड बनावट असल्याचे स्पष्ट झाले. पुढील चौकशीत संबंधित महिलेचे नाव जाकिया अबुल काहेर फोकर (वय २८) असे असून ती मूळची बांगलादेशातील खुलना येथील रहिवासी असल्याचे समोर आले.
या उघडकीनंतर संपूर्ण प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. संबंधित महिला भारतात नेमकी कोणत्या मार्गाने दाखल झाली? तिला बनावट आधारकार्ड कोणी उपलब्ध करून दिले? ती महाराष्ट्रात किती दिवसांपासून राहत होती? याचा आता पोलीस कसून तपास करत आहेत. याशिवाय तिचा मानवी तस्करी, बनावट कागदपत्र रॅकेट किंवा इतर गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला विविध शहरांमध्ये वास्तव्यास होती किंवा स्थानिक ओळखपत्रांचा वापर करून स्वतःची ओळख लपवत होती, असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून तिच्या मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड, सोशल मीडिया अकाउंट्स, आर्थिक व्यवहार आणि डिजिटल पुराव्यांचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही वर्षांपूर्वी जळगाव आणि भुसावळ परिसरातही अशाच प्रकारे बांगलादेशी महिलांचा शोध लागला होता. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे आणखी मोठ्या नेटवर्ककडे जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, पोलिसांनी संबंधित महिलेविरोधात बनावट कागदपत्रांचा वापर, बेकायदेशीर वास्तव्यासह इतर गंभीर कलमांनुसार पुढील कारवाई सुरू केली असून, तपास वेगाने सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तपास पुढे सरकत असताना आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

