अमरावतीत विधान परिषद रणसंग्राम पेटला! आजपासून उमेदवारी अर्ज दाखल; महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये प्रतिष्ठेची लढत

फुले शाहू आंबेडकर
0

अमरावती | प्रतिनिधी
अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी अधिकृतपणे सुरू झाली असून, सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात स्वतंत्र निवडणूक कक्ष उभारण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी राजकीय हालचालींना वेग आला असून, इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ जून निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर २ जून रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, वैध उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली जाईल. ४ जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची संधी असेल.
या निवडणुकीसाठी मतदान १८ जून रोजी होणार असून, मतमोजणी २२ जूनला केली जाणार आहे. यावेळी वाढती उष्णता आणि बदलते वातावरण लक्षात घेता प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. केवळ जिल्हा मुख्यालयापुरते मतदान मर्यादित न ठेवता, उपविभागीय अधिकारी (SDO) स्तरावरही मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण सात मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
ही निवडणूक ईव्हीएमऐवजी पारंपरिक मतपत्रिकेद्वारे घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे, मतदारांना उमेदवारांसमोर शिक्का मारायचा नसून पसंतीक्रम नोंदवावा लागणार आहे. त्यामुळे ही निवडणूक “एकल संक्रमणीय मतदान पद्धती” अंतर्गत होत असल्याने प्रत्येक मत महत्त्वाचे ठरणार आहे.
महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींचे सदस्य हे या निवडणुकीतील प्रमुख मतदार आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागा रिक्त असल्याने त्या सदस्यांना यावेळी मतदानाचा अधिकार राहणार नाही.
राजकीय गणित पाहता, या निवडणुकीत महायुतीचे पारडे जड मानले जात आहे. भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक १५० मतदार असून, काँग्रेसकडे १२० मतदार आहेत. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, युवा स्वाभिमान, प्रहार, शिंदेसेना आणि बसप यांचा समावेश असून, त्यांचे एकत्रित मतबल २५१ पर्यंत पोहोचत असल्याचा दावा केला जात आहे.
दुसरीकडे, काँग्रेससोबत उद्धवसेना आणि शरद पवार गटाची राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाविकास आघाडीची ताकद १५२ मतांपर्यंत पोहोचू शकते. याशिवाय एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पक्ष आणि अपक्ष सदस्यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज प्रक्रियेला सुरुवात होताच इच्छुकांमध्ये हालचाली वाढल्या असून, पक्षांतर्गत लॉबिंग, गुप्त बैठका आणि राजकीय रणनीतींना वेग आला आहे. आगामी काही दिवसांत अमरावतीच्या राजकारणात मोठे राजकीय ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default