मोबाईल कॉल न उचलणाऱ्या मुलाचा शोध घेत निघालेल्या पित्याला दिसला थेट मृतदेह; शिरसोली नाक्यावर हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

फुले शाहू आंबेडकर
0

जळगाव शहरातील शिरसोली नाका परिसर सोमवारी दुपारी अक्षरशः हादरून गेला. सकाळपासून मुलगा फोन उचलत नसल्याने चिंतेत पडलेले वृद्ध वडील त्याचा शोध घेत रस्त्यावर फिरत होते; मात्र काही वेळातच त्यांच्या डोळ्यांसमोर आलेले दृश्य काळजाचा ठोका चुकवणारे ठरले. जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेला मुलगा पाहताच पित्याने घटनास्थळीच टाहो फोडला. नंतर डॉक्टरांनी संबंधित तरुणाला मृत घोषित करताच परिसरात एकच खळबळ उडाली.
मृत तरुणाचे नाव शशिकांत रमेश कोळी (वय ३६) असे असून तो खासगी कंपनीत वाहनचालक म्हणून कार्यरत होता. तो मूळचा रावेर तालुक्यातील अंदलवाडी येथील रहिवासी असून सध्या मोहाडी रोडवरील जीवनज्योती सोसायटी परिसरात वास्तव्यास होता.
माहितीनुसार, सोमवारी सकाळपासून शशिकांत यांच्याशी त्यांचे वडील रमेश कोळी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. अनेक वेळा फोन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या मनात भीती निर्माण झाली. अखेर मुलाचा शोध घेण्यासाठी ते स्वतः बाहेर पडले. दरम्यान, शिरसोली नाका परिसरात काही नागरिकांना एक तरुण जमिनीवर पडल्याचे दिसून आले. जवळ जाऊन पाहिले असता तो शशिकांत असल्याचे स्पष्ट झाले.
ही माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी गणेश शिरसाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बेशुद्ध अवस्थेतील शशिकांत यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेची एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
“माझ्या मुलाचा घातपात झाला” — वडिलांचा गंभीर आरोप
या घटनेनंतर मृताच्या वडिलांनी अत्यंत गंभीर आरोप करत मुलाच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. रमेश कोळी यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात शशिकांत याला काही जणांनी मारहाण केली होती. तसेच त्याला जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या. या संदर्भात रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रारदेखील दाखल करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय रविवारी सायंकाळीदेखील मुलाला पुन्हा धमकावण्यात आले होते, असा दावा त्यांनी केला आहे. त्यानंतर अवघ्या काही तासांत मुलाचा मृत्यू झाल्याने संशय अधिक गडद झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.
पोलिस तपासाकडे सर्वांचे लक्ष
दरम्यान, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स तसेच संबंधित तक्रारींची पडताळणी केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
शिरसोली नाका परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून “फोन न उचलणाऱ्या मुलाचा शोध घेताना थेट मृतदेह समोर येणे” या दुर्दैवी प्रसंगाने संपूर्ण जळगाव हादरले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default