शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर डल्ला मारत प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कृषी विभागाने मोठी धडक कारवाई केली आहे. दोंडाईचा शहरातील गरीब नवाज नगर परिसरात टाकलेल्या छाप्यात तब्बल ७२ हजार ७५० रुपयांचा अवैध बियाणे साठा जप्त करण्यात आला असून या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
सरकारने स्पष्ट बंदी घातलेले एचटीबीटी कापूस बियाणे गुप्तपणे साठवून ठेवून विक्रीची तयारी सुरू असल्याची माहिती कृषी विभागाला मिळताच अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने तातडीने कारवाई केली. या धाडीत मोठ्या प्रमाणावर संशयित बियाण्यांचे पॅकेट्स आढळून आले. संबंधित व्यक्तीकडे वैध परवाना, बिल किंवा अधिकृत कागदपत्रांची मागणी करण्यात आली असता कोणतेही दस्तऐवज सादर करता आले नाहीत.
या प्रकरणी निजाम कमरुद्दीन मन्सुरी याच्याविरोधात दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका कृषी अधिकारी तथा गुण नियंत्रक मयूर गौतम भामरे यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी विविध कायद्यांअंतर्गत गुन्ह्यांची नोंद केली.
शेतकऱ्यांच्या भविष्याशी खेळ !
प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्यांचा वापर केल्याने अनेकदा शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही, तर काही वेळा संपूर्ण पीक धोक्यात येते. बाजारात “जास्त उत्पादन” आणि “जबरदस्त
फायदा” अशा आमिषांनी हे बियाणे विकले जात असल्याचे समोर येत आहे.
फायदा” अशा आमिषांनी हे बियाणे विकले जात असल्याचे समोर येत आहे.
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना स्वप्न दाखवून त्यांच्या हातात बनावट अथवा अनधिकृत बियाणे देणारे रॅकेट सक्रिय असल्याची चर्चा कृषी वर्तुळात सुरू आहे. अनेक शेतकरी लाखो रुपये खर्च करून शेवटी उद्ध्वस्त होत असल्याने प्रशासनाने अशा व्यवहारांवर कठोर भूमिका घेतली आहे.
प्रशासनाचा इशारा : “अवैध बियाणे विक्रेत्यांना सोडणार नाही”
जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने यापूर्वीच जिल्ह्यातील सर्व बियाणे विक्रेत्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की, प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्यांची विक्री, वाहतूक किंवा साठवणूक आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. तरीही काही जण नियम धाब्यावर बसवत काळाबाजार करत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, कोणतेही बियाणे खरेदी करताना अधिकृत परवाना, पावती आणि कंपनीची वैध माहिती तपासावी. संशयास्पद विक्री आढळल्यास त्वरित कृषी विभाग किंवा पोलिसांना माहिती द्यावी.
कोणकोणत्या कलमांखाली गुन्हा?
या प्रकरणात आरोपीविरोधात बीएनएस कायदा कलम ३१६, ३१८ तसेच अनधिकृत कापूस बियाणे विक्री प्रतिबंधक नियम १९६८ मधील विविध कलमे आणि बियाणे नियंत्रण आदेश १९८३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दोंडाईचा पोलिसांकडून सुरू आहे.
“शेतकऱ्यांच्या विश्वासाशी गद्दारी करणाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाईची वेळ आली आहे,”
अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत.औ

