नाशिक | प्रतिनिधी
“तुमच्या घरात गुप्तधन आहे… पण त्यावर अघोरी शक्तींचा पहारा आहे!”
अशा भीतीदायक आणि अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढून एका तरुणाची तब्बल दोन एकर वडिलोपार्जित शेती आणि दीड लाख रुपये लाटल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणाने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी संशयित भोंदूबाबा आणि त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात कमलेश उर्फ शिवकुमार अधिकारी आणि त्याची पत्नी गौरी कमलेश अधिकारी (रा. पाथर्डी फाटा, नाशिक) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह फसवणूक, धमकी आणि बेकायदेशीर बळजबरीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आई-वडिलांच्या मृत्यूचं भय दाखवून जाळ्यात ओढलं
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील लऊळ गावचे मदन नवनाथ देवकर (वय २६) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, सप्टेंबर २०२३ मध्ये मदन देवकर आणि त्यांच्या भावाची ओळख नाशिकमधील पाथर्डी फाटा परिसरात राहणाऱ्या संशयितांशी झाली होती.
फिर्यादीचे आई-वडील वारले असल्याची माहिती मिळताच संशयितांनी त्याचा गैरफायदा घेतला.
“तुमच्या आई-वडिलांचा मृत्यू नैसर्गिक नाही… त्यांच्यावर करणी करण्यात आली होती,” असे सांगत दोन्ही भावांच्या मनात भीती निर्माण करण्यात आली. त्यानंतर “घरावरील शाप दूर करायचा असेल तर अघोरी पूजा करावी लागेल,” असे सांगून त्यांना विविध ठिकाणी नेण्यात आले.
कोंबड्या-बकऱ्यांचे बळी, अघोरी विधी आणि पैशांची उकळपट्टी
फिर्यादीनुसार, उज्जैन, पिंपरखेड आणि पेगलवाडी फाटा परिसरात कथित अघोरी पूजा करण्यात आली. या विधींमध्ये कोंबड्या आणि बकऱ्यांचे बळी देण्यात आल्याचा आरोप आहे.
“गुप्तधन बाहेर काढण्यासाठी विशेष पूजा करावी लागेल,” असे सांगून संशयितांनी फिर्यादीकडून सुमारे दीड लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे.
आधार कार्ड ते शेतीचे कागद; सर्व काबीज
अंधश्रद्धा आणि भीतीच्या सावटाखाली संशयितांनी दोन्ही भावांकडील आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांना धमकावून रजिस्ट्रार कार्यालयात नेण्यात आले.
तिथे मदन देवकर यांच्या नावावरील मौजे लऊळ येथील अंदाजे १८ लाख रुपये किमतीची दोन एकर वडिलोपार्जित शेती “महादेवी ज्ञानविद्या ट्रस्ट” या संस्थेच्या नावावर बक्षीसपत्र करून घेतल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
आश्रमात डांबून ठेवले; बाहेरील संपर्क तोडला
जमीन हस्तांतरणानंतर प्रकरण उघड होऊ नये म्हणून दोन्ही भावांना त्र्यंबकेश्वर येथील एका आश्रमात तसेच इतर मठांमध्ये जबरदस्तीने ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. त्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवत नातेवाईकांशी संपर्क तोडण्यात आला.
“जर पोलिसांत गेलात किंवा कुणाला सांगितलं तर गंभीर परिणाम होतील,” अशी धमकी देऊन मानसिक छळ करण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
‘अंनिस’च्या हस्तक्षेपानंतर प्रकरण उघड
अखेर या दोन्ही तरुणांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. त्यानंतर ‘अंनिस’चे डॉ. ठकसेन गोराणे, कृष्णा चांदगुडे आणि इतर पदाधिकारी पीडितांसह इंदिरानगर पोलिस ठाण्यात पोहोचले.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांना संपूर्ण प्रकाराची माहिती देण्यात आली. प्राथमिक पडताळणीनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून तपास वेगात
या प्रकरणात आर्थिक फसवणूक, अंधश्रद्धा पसरवणे, मानसिक छळ, धमकी आणि जमीन बळकावण्याचा कट अशा विविध अंगांनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. संबंधित ट्रस्ट, आर्थिक व्यवहार आणि कथित आश्रमांमधील हालचालींचाही तपास केला जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे अंधश्रद्धेच्या नावाखाली ग्रामीण भागातील नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या भोंदूबाबांच्या कारवायांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

