नाशिकमध्ये ‘एमडी’चा स्फोटक काळाबाजार!पोलिसांच्या धडाकेबाज कारवायांनंतरही ड्रग्ज माफियांचा विळखा कायम; मालेगाव कनेक्शन उघड, नातलगांनीच उभारले ‘फॅमिली सिंडिकेट’

फुले शाहू आंबेडकर
0
नाशिक | प्रतिनिधी
नाशिक शहरात अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवून अनेक कुख्यात तस्करांना गजाआड केले असले, तरी ड्रग्जचा काळाबाजार अजूनही शहराच्या नसानसांत पोहोचल्याचे भीषण वास्तव पुन्हा समोर आले आहे. विशेष म्हणजे, तीन वर्षांत मॅफेड्रॉन अर्थात ‘एमडी’ ड्रग्जच्या दरात तब्बल दुपटीने वाढ झाली असून, तरीही या विषारी जाळ्याची मागणी कमी झालेली नाही. यामुळे नाशिकमधील तरुणाई कोणाच्या विळख्यात अडकतेय? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबईनाका परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकाने नुकत्याच केलेल्या धाडसी कारवाईत तिघा संशयितांना अटक करण्यात आली असून, या कारवाईतून थेट मालेगाव ड्रग्ज नेटवर्कचे धागेदोरे समोर आले आहेत. पोलिसांनी सुमारे ७ लाख ३६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणाने पुन्हा एकदा शहरातील वाढत्या ड्रग्ज साखळीचा पर्दाफाश केला आहे.
तीन वर्षांत एमडीचा दर दुप्पट; तरीही मागणी कायम
सन २०२३ मध्ये नाशिकमध्ये कुख्यात ड्रग्ज माफिया ललित पानपाटील, सनी पगारे आणि नसरीन शेख उर्फ ‘छोटी भाभी’ टोळीचा पर्दाफाश झाला होता. त्यावेळी शहरात एमडीचा दर प्रतिग्रॅम दोन ते अडीच हजार रुपयांच्या घरात होता. पोलिसांच्या सलग कारवायांमुळे स्थानिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली; मात्र याच परिस्थितीचा फायदा घेत तस्करांनी कृत्रिम टंचाई निर्माण केली आणि आता हाच एमडी चार ते पाच हजार रुपयांपर्यंत विकला जात असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, पकडलेल्या संशयितांनी हे ड्रग्ज थेट मालेगावातून आणल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये पुन्हा नव्याने उभे राहत असलेले ड्रग्ज नेटवर्क आणि त्यामागील मुख्य सूत्रधार कोण? याचा तपास आता अधिक वेगाने सुरू झाला आहे.
गोपनीय माहितीवरून पोलिसांचा सापळा
एनडीपीएस पथकाचे अंमलदार चंद्रकांत बागडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशीला कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील, सचिन चौधरी, पोलिस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, सहायक उपनिरीक्षक संजय ताजणे, देवकिसन गायकर, बाळासाहेब नाहे, भारत डेबाळे, अर्चना भड यांच्यासह पथकाने मुंबईनाका परिसरात सापळा रचला.
संशयित जाकीर रफीक शेख (वय ३५, भद्रकाली) हा साथीदारांसह कारमधून परिसरात येताच पोलिसांनी त्यांना घेराव घालत ताब्यात घेतले. त्यानंतर करण्यात आलेल्या झडतीत मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
काय जप्त झाले?
जाकीर शेख याच्याकडून सुमारे ८५ ग्रॅम एमडी ड्रग्ज, मोबाईल आणि रोख रक्कम जप्त
शाहरूख युसूफ शेख याच्याकडून रोकड व दोन महागडे मोबाईल हस्तगत
सिराज सोहराब शेख याच्याकडून रोकड, महागडा मोबाईल आणि तस्करीसाठी वापरण्यात आलेली कार जप्त
एकूण मुद्देमालाची किंमत ७ लाखांहून अधिक असल्याची माहिती
गुन्हेगारीतही ‘फॅमिली नेटवर्क’!
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेले तिघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांची नजर चुकवण्यासाठी आणि व्यवहार गुप्त ठेवण्यासाठी नातेसंबंधांचा वापर करून हे ‘फॅमिली सिंडिकेट’ चालवले जात होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. पैशांच्या हव्यासापोटी नात्यांचाही गैरवापर करून हे जाळे उभे करण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
तरुणाईला लक्ष्य करणारे जाळे कोणाचे?
एमडीसारख्या घातक अमली पदार्थांचा दर वाढूनही त्याची मागणी कायम असल्याने नाशिकमध्ये सक्रिय असलेल्या ग्राहकांचे आणि पुरवठादारांचे मोठे नेटवर्क कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मालेगावातून येणारा पुरवठा, स्थानिक वितरण साखळी आणि या मागील आर्थिक व्यवहार यांचा आता पोलिसांकडून बारकाईने तपास सुरू आहे.
दरम्यान, मुंबईनाका पोलिसांनी या प्रकरणात आणखी काही संशयितांचा शोध सुरू केला असून, शहरातील ड्रग्ज रॅकेटविरोधात आगामी काळात आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default