धुळे तालुक्यातील सोनगीर परिसरात भरदिवसा चित्रपटालाही लाजवेल असा थरार घडला असून ड्रायफ्रुट व्यापाऱ्यावर पेपर स्प्रे फेकून लोखंडी रॉडने हल्ला करत तब्बल १ लाख २० हजार रुपयांची रोकड लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रामी गावाजवळ सकाळच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कापडणे येथील कामगार नगर परिसरात राहणारे ड्रायफ्रुट व्यापारी वासुदेव दयाराम माळी (वय २८) यांना २० मे रोजी एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला होता. संबंधित व्यक्तीने स्वतःला रामी येथील रहिवासी असल्याचे सांगत मोठ्या प्रमाणावर ड्रायफ्रुट खरेदी करायची असल्याचे सांगितले. मात्र, “फोनवर व्यवहार करत नाही,” असे माळी यांनी स्पष्ट केल्यानंतर त्या व्यक्तीने “रामी येथे या, समक्ष चर्चा करू,” असे सांगितल्याचे समजते.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच २१ मे रोजी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास वासुदेव माळी हे आपल्या मालकीच्या ओमनी गाडी (MH-18 R-0175) मधून ड्रायफ्रुट विक्रीसाठी निघाले होते. त्यांच्या सोबत शेजारी राहणारा गौरव रवींद्र पाटील हा युवकही होता.
दरम्यान, सकाळी सुमारे ८:५५ वाजता ते बुरझड गावाजवळ पोहोचले असता पुन्हा त्या अनोळखी व्यक्तीचा फोन आला. “रामीजवळ आलात का?” अशी विचारणा करण्यात आली. माळी यांनी आपण जवळच असल्याचे सांगताच काही क्षणांत दोन विनक्रमांकाच्या मोटारसायकलींवर चार इसम तोंडाला रुमाल बांधून त्यांच्या समोर आले.
पेपर स्प्रे फेकत लोखंडी रॉडने हल्ला
चोरट्यांनी थेट ओमनी गाडीसमोर मोटारसायकली आडव्या लावत वाहन थांबवले. काय प्रकार आहे हे विचारण्यासाठी वासुदेव माळी खाली उतरले असता आरोपींनी त्यांच्या चेहऱ्यावर पेपर स्प्रे फेकला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्यांच्या डोळ्यांत तीव्र जळजळ सुरू झाली. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला; मात्र तीन आरोपींनी त्यांचा पाठलाग करत लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली.
या हल्ल्यात त्यांच्या डाव्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. व्यापारी खाली कोसळताच आरोपी पुन्हा ओमनी गाडीकडे धावले. गाडीत बसलेल्या गौरव पाटील याला पकडून ठेवत आरोपींनी व्यापारासाठी ठेवलेली १ लाख २० हजार रुपयांची रोकड हिसकावून घेतली आणि काही क्षणांत घटनास्थळावरून पसार झाले.
पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी चार अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ व ११८(१) अन्वये सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सोनगीर पोलीस करीत आहेत.
व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
भरदिवसा नियोजनबद्ध पद्धतीने घडलेल्या या लुटीमुळे सोनगीर, रामी आणि परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनोळखी ग्राहकांच्या नावाखाली व्यापाऱ्यांना सापळ्यात ओढून लुटण्याच्या नव्या पद्धतीमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

