या कारवाईनंतर “बिल मंजुरीसाठी टक्केवारीशिवाय फाईल हलत नाही” या चर्चांना पुन्हा खतपाणी मिळाले असून, या व्यवहारामागे आणखी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संगनमत होते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘१८ लाखांपासून सुरू झालेली डील १५ लाखांवर ठरली’
एसीबी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार कंत्राटदाराने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण केले होते. मात्र सुमारे ३८ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचे देयक प्रलंबित ठेवण्यात आले होते. हे बिल मंजूर करण्यासाठी सुरुवातीला तब्बल १८ लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.
कंत्राटदाराने एवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगितल्यानंतर कथित तडजोड करण्यात आली आणि अखेर १५ लाख रुपयांवर व्यवहार निश्चित झाल्याचे समोर आले. त्यातील पहिला हप्ता म्हणून पाच लाख रुपये तातडीने देण्याचे ठरले होते.
एसीबीचा सापळा आणि ‘ऑपरेशन रेडहँड’
लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने थेट एसीबी कार्यालय गाठत संपूर्ण प्रकाराची लेखी तक्रार केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी मागणीची पडताळणी केली असता कथित लाच व्यवहार स्पष्ट झाल्याने सापळा रचण्यात आला.
शनिवारी पंचांसमक्ष चिन्हांकित नोटा देण्यात आल्यानंतर ठरल्याप्रमाणे संशयित शाखा अभियंत्याने पाच लाख रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने धाड टाकून त्यांना रंगेहाथ पकडले. या अचानक झालेल्या कारवाईमुळे कार्यालय परिसरात एकच धावपळ उडाली होती. कर्मचारी आणि अधिकारीही काही काळ गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
“एकट्याचा खेळ की वरपर्यंत साखळी?”
या प्रकरणानंतर सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे मागितलेली कथित रक्कम ही फक्त एका अधिकाऱ्यासाठी होती की त्यामागे आणखी मोठी साखळी कार्यरत होती?
सार्वजनिक बांधकाम विभागात कंत्राटदारांकडून टक्केवारी घेतल्याशिवाय बिले मंजूर होत नसल्याच्या तक्रारी यापूर्वीही वारंवार समोर आल्या होत्या. विशेषतः रस्ते, इमारत दुरुस्ती, काँक्रिटीकरण आणि विकासकामांमध्ये आर्थिक व्यवहारांवर संशय व्यक्त केला जात होता.
एसीबी आता संशयित अधिकाऱ्याचे आर्थिक व्यवहार, मालमत्ता, बँक व्यवहार आणि अलीकडील संपर्क तपासत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे या प्रकरणातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कायदेशीर प्रक्रिया सुरू
या प्रकरणी शाखा अभियंत्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, निरीक्षक हेमंत नागरे आणि त्यांच्या पथकाने केली.
दरम्यान, अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत संशयित व्यक्ती दोषी असल्याचे अंतिमरित्या सिद्ध झालेले नाही. पुढील चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच या प्रकरणातील जबाबदाऱ्या स्पष्ट होणार आहेत.

