“VIP ट्रेडिंग ग्रुप”च्या जाळ्यात अभियंता; ३ कोटी १४ लाखांचा सायबर दरोडा, बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश!

फुले शाहू आंबेडकर
0


धुळे शहरातील एका अभियंत्याला अल्पावधीत कोट्यवधींचा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर भामट्यांनी तब्बल ३ कोटी १४ लाख ९९ हजार ८९१ रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ऑनलाइन शेअर ट्रेडिंग, आयपीओ गुंतवणूक आणि “एचएनआय व्हीआयपी ग्रोथ”च्या नावाखाली रचलेल्या या सायबर कटाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार आरोपींना अटक करण्यात धुळे सायबर पोलिसांना यश आले आहे.
सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या सावटात धुळे पोलिसांनी उघड केलेला हा प्रकार केवळ फसवणूक नसून, डिजिटल माध्यमातून रचलेला आर्थिक दरोडाच असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
व्हॉट्सअॅप लिंकपासून सुरू झाला कोट्यवधींचा सापळा
तक्रारदार अभियंता हर्षद नारायण देशपांडे (रा. स्नेहनगर, धुळे) यांच्या मोबाईलवर एका अज्ञात क्रमांकावरून संशयास्पद लिंक पाठवण्यात आली. लिंक उघडताच त्यांना “848FYERS HNI VIP Growth Hub” नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडण्यात आले. त्यानंतर “FYERS INDIA (HNI)” नावाचे अॅप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले.
या अॅपच्या माध्यमातून शेअर मार्केट ट्रेडिंग, आयपीओ आणि प्रीमियम इन्व्हेस्टमेंटमध्ये मोठा नफा मिळेल, काही दिवसांत गुंतवणूक दुप्पट होईल, अशा गोड बोलांनी अभियंत्याचा विश्वास संपादन करण्यात आला.
सुरुवातीला छोटा नफा; नंतर कोट्यवधींची उकळी
सायबर टोळीने सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये थोडाफार परतावा देऊन विश्वास निर्माण केला. त्यामुळे तक्रारदाराचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर “मोठी गुंतवणूक करा, प्रीमियम ट्रेडिंगमध्ये प्रवेश मिळेल” असे सांगत आरोपींनी वेळोवेळी विविध बँक खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यास भाग पाडले.
आरटीजीएस, एनईएफटी आणि यूपीआय व्यवहारांच्या माध्यमातून देशपांडे यांनी तब्बल ३.१४ कोटी रुपये आरोपींच्या खात्यांमध्ये वर्ग केले. मात्र, काही दिवसांनी परतावा मिळणे बंद झाले. संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपींकडून प्रतिसाद मिळेनासा झाला आणि आपली मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
वसईतील बनावट कॉल सेंटरमधून सुरू होता ‘सायबर बाजार’
तक्रार दाखल होताच धुळे सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मोबाईल क्रमांक, आयपी लॉग, डिजिटल व्यवहारांची साखळी आणि बँक खात्यांचा मागोवा घेत असताना तपासाची दिशा थेट नायगाव (वसई) परिसराकडे वळली.
तपासात धक्कादायक बाब समोर आली. वसई परिसरात एक बनावट कॉल सेंटर सुरू असून, तेथून देशभरातील नागरिकांना फोन करून शेअर मार्केटमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले जात होते. व्हॉट्सअॅप ग्रुप, फेक ट्रेडिंग अॅप्स आणि बनावट इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना जाळ्यात ओढले जात असल्याचे उघड झाले.
पोलिसांची मोठी कारवाई; एक कोटी १९ लाख रुपये गोठवले
सायबर पोलिसांनी तातडीने आर्थिक व्यवहार गोठवण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यात फसवणुकीतील तब्बल १ कोटी १९ लाख रुपये गोठवून तक्रारदाराला परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे. तपासादरम्यान मोबाईल फोन, बँक व्यवहारांची कागदपत्रे, डिजिटल पुरावे आणि इलेक्ट्रॉनिक डेटा जप्त करण्यात आला आहे.
चौघांना बेड्या; इतरांचा शोध सुरू
या प्रकरणी पोलिसांनी सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी साबीर मोहम्मद खान, सनत संजीव दास, राहुलकुमार शुक्ला उर्फ कैलाश राकेशकुमार आणि आमिर करमशेर खान या चौघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून, आणखी मोठे सायबर रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलीस अधीक्षकांच्या विशेष मोहिमेचा परिणाम
जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सायबर गुन्हेगारांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत सायबर पोलिसांनी अल्पावधीत अनेक आर्थिक गुन्ह्यांचा छडा लावला असून, या कारवाईकडे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सायबर ऑपरेशनपैकी एक म्हणून पाहिले जात आहे.
नागरिकांना पोलिसांचे कठोर आवाहन
ऑनलाइन ट्रेडिंग, आयपीओ गुंतवणूक किंवा “व्हीआयपी इन्व्हेस्टमेंट ग्रुप”च्या नावाखाली सोशल मीडियावर फिरणाऱ्या जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. केवळ ‘सेबी’ नोंदणीकृत अधिकृत ब्रोकर्समार्फतच व्यवहार करावेत, अनोळखी अॅप्स डाउनलोड करू नयेत, तसेच व्हॉट्सअॅप किंवा टेलिग्रामवरील आर्थिक सल्ल्यांवर आंधळा विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
सायबर फसवणूक झाल्यास तातडीने राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन १९३० वर संपर्क साधावा किंवा जवळच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default