"स्मार्ट मीटरवर काँग्रेसचा एल्गार! नागरिकांच्या संमतीशिवाय मीटर बसवले तर रस्त्यावर उतरू"

फुले शाहू आंबेडकर
0
महावितरणला काँग्रेसचा इशारा; वाढीव वीजबिले, चुकीचे रीडिंग आणि ग्राहकांच्या तक्रारींवर संताप
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
शहरातील स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने महावितरण प्रशासनाला निवेदन देत नागरिकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
काँग्रेसच्या मते, शहरातील अनेक ग्राहकांना नवीन वीज मीटर मिळण्यात होणारा विलंब, खराब किंवा बंद पडलेले मीटर वेळेत न बदलणे, चुकीचे मीटर रीडिंग, वाढीव वीज बिले तसेच तक्रारींचे वेळेत निराकरण न होणे यामुळे आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाने महावितरणसमोर विविध मागण्या मांडल्या आहेत.
 नागरिकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटरला विरोध
काँग्रेसने स्पष्ट भूमिका घेत नागरिकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली आहे. वीज ही मूलभूत गरज असल्याने ग्राहकांवर कोणताही निर्णय लादणे योग्य नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नागरिकांमध्ये स्मार्ट मीटरमुळे वाढीव बिले येण्याची भीती व्यक्त केली जात असल्याचा दावा काँग्रेसने केला असून या भीतीचे निरसन करण्यासाठी प्रशासनाने पारदर्शक भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
वाढीव वीजबिले आणि चुकीच्या रीडिंगचा मुद्दा ऐरणीवर
शहरातील अनेक ग्राहकांनी चुकीच्या मीटर रीडिंगमुळे वाढीव वीजबिले आल्याच्या तक्रारी केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. अशा प्रकरणांची चौकशी करून संबंधित बिलांमध्ये तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा ग्राहकांचा रोष आणखी वाढू शकतो, असा इशाराही देण्यात आला.
 "लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन" – काँग्रेस
शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम यांनी प्रशासनाला थेट इशारा देताना सांगितले की, सामान्य नागरिकांवर अनावश्यक आर्थिक भार टाकणे योग्य नाही. ग्राहकांच्या समस्या तातडीने सोडविण्यात आल्या नाहीत तर काँग्रेस पक्ष नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारेल.
काँग्रेसच्या प्रमुख मागण्या
नागरिकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया थांबवावी.
खराब व सदोष मीटर तातडीने बदलावेत.
चुकीच्या वीज बिलांची चौकशी करून दुरुस्ती करावी.
प्रलंबित मीटर जोडणी अर्ज निकाली काढावेत.
प्रभावी व पारदर्शक तक्रार निवारण यंत्रणा उभी करावी.
निवेदनावेळी उपस्थित
या निवेदनावेळी शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम यांच्यासह इब्राहिम पठाण, शेख अथर, डॉ. पवन डोंगरे, इंजि. विशाल बन्सवाल, आमेर अब्दुल सलीम, मोहम्मद जाकेर, मोहसीन खान, मोईन कुरेशी, योगेश थोरात, शेख नवीद, शफीक शहा, इरफान पठाण, नदीम सौदागर, शेख जमील, शब्बीर पटेल, मुदस्सिर अन्सारी, शेख जहीर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
(कायदेशीर सूचना)
वरील बातमी ही काँग्रेस पक्षाने दिलेल्या निवेदनातील दावे, आरोप व मागण्यांवर आधारित आहे. संबंधित मुद्द्यांबाबत महावितरण प्रशासनाची अधिकृत भूमिका किंवा स्पष्टीकरण प्राप्त झाल्यास तेही प्रसिद्ध केले जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default