जलयुक्त शिवार योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी चौघांना अटक ; चार वर्षानंतर कारवाई
बुधवार, मार्च १६, २०२२
0
जलयुक्त शिवार योजनेतील गैरव्यवहार प्रकरणात दाखल झालेल्या दोन गुन्ह्यात चार वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेने काल (सोमवार) रात्री दोन निवृत्त कृषी अधिकार्यांसह दोन कृषी सहाय्यकांना अटक केली आहे. तत्कालीन जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांच्या परळी तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामे न करताच दोन कोटी रुपये हडप करण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यानंतर तत्कालीन कृषी अधिकारी आणि काही कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. काही अधिकार्यांना अटक झाली, त्यांची जामीनावर सुटकाही झाली. गैरव्यवहारातील रक्कम वसुल करण्याबाबतही नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.
गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक हरीभाऊ खाडे यांच्या पथकाने सोमवारी रात्री परळी शहरातून शिवाजी शंकरराव हजारे, विजयकुमार अरुण भताने या दोन निवृत्त कृषी अधिकार्यांसह पांडुरंग जंगमे आणि अमोल कराड या कृषी सहाय्यकांना अटक केली आहे.
परळी तालुक्यात चार वर्षापूर्वी बहुचर्चित जलयुक्त शिवार योजनेतुन मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली. मात्र काही ठिकाणी तालुका कृषी अधिकारी आणि कंत्राटदारांनी संगनमत करुन कामे न करताच निधी हडप केल्याचे प्रकरण समोर आले. या प्रकाराची तक्रार झाल्यानंतर राज्य विभाग आणि जिल्हास्तरावरुन या कामाची चौकशी झाली. त्यात २०१८ मध्ये दोन कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. दाखल गुन्ह्यातील १२ आरोपींना अटक करण्यात आली होती. तर संबंधितांकडून रक्कम वसुलीची नोटीस बजावण्यात आल्या होत्या. दरम्यान या प्रकरणाचा तपास स्थानिक आर्थिक गुन्हा शाखेकडे आल्यानंतर फरार आरोपींचा शोध घेण्यात आला.
Tags
