मिळालेल्या माहितीनुसार, खंबाळे येथे भाऊसाहेब किसन आंधळे हे पत्नी मंदाकिनी, मुलगा विशाल आणि मुलगी सोनल यांच्यासह वास्तव्यास असून शेती करतात. त्यांचे गट नं. ४७९ मध्ये शेततळे असून २८ मे ला सकाळी ७ः३० वाजेच्या सुमारास भाऊसाहेब आंधळे आणि मुलगी सोनल हे दोघे शेतावर शेततळ्यात पाणी किती आहे हे पाहण्यासाठी गेले होते. शेततळ्यातील पाणी पाहिल्यानंतर मुलगी सोनल वडिलांना म्हणाली की, तुम्ही घरी जा, मी थोडावेळ थांबते आणि मग येते. असं म्हटल्याने वडिल भाऊसाहेब हे घरी अंघोळ करण्यासाठी निघून आले.
यानंतर अर्धा तास होऊनही मुलगी सोनल घरी न परतल्याने भाऊसाहेब यांनी पुन्हा शेतात जाऊन पाहिले असता ती तेथे दिसली नाही. त्यामुळे भाऊसाहेब यांनी आजूबाजुला शोध घेतला. यावेळी शेततळ्यावर जाऊन पाहिले असता मुलगी सोनल शेततळ्यात बुडाल्याचे दिसून आले.
यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या मदतीने सोनलला शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले. तिला उपचारांसाठी त्वरीत दोडी ग्रामीण रुग्णालायात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता तिला मृत घोषित केले. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आकस्मित नोद करण्यात आली आहे. सोनलच्या अचानक जाण्याने आंधळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
