नाशिकच्या (Nashik) म्हसरुळ पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विवाहितेचे वडील ज्ञानेश्वर शेना धनगर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मृत विवाहितेचा पती धनंजय संतोष धनगर आणि सासू संगीता संतोष धनगर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वीच मखमलाबाद रोडवर गोकूळनगरला राहणाऱ्या श्रद्धा धनंजय धनगर हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. मृत श्रद्धा व जळगावचा संशयित आरोपी धनंजय धनगर या दोघांचा पाच महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवसांनी पती व सासू यांनी नवीन ऑफिस घेण्यासाठी माहेरून २० लाख रुपये आणावे, अशी मागणी करत होते. पैसे आणत नसल्याने श्रद्धा यांचा शारीरिक व मानसिक छळ (Domestic Violence) करून तिला मारहाण करीत उपाशी ठेवले.
तसेच, चॅटमध्ये श्रद्धाने उद्या माझ्या मयतीला या असा मेसेज केल्यास त्यावर हास्यास्पद अशी इमोजी पाठविली होती. अशा प्रकारे वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून श्रद्धा धनगर माहेरी निघून गेली होती. त्यावेळी झालेल्या प्रकाराबाबत तिने कुटुंबीयांना माहितीही होती. अखेर दोन दिवसांपूर्वी वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी म्हसरुळ पोलिसांनी पती धनंजय धनगर याला अटक केली असून म्हसरुळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस. आय. चतुर पुढील तपास करत आहे.
