मिळालेल्या माहितीनुसार, ब्रायन राको हा पत्नी पूनम आणि ७ वर्षांची मुलगी अनायका ब्राको यांच्यासोबत वसईच्या एव्हरशाईन येथे वास्तव्यास होता. खासगी कंपनीत काम करणारा ब्राको कर्जबाजारी झाला होता. कर्जाच्या दडपण असल्याने राको कुटुंबीयांची मानसिक स्थिती ढासळली होती. गेल्या आठवड्यात वसईच्या एक्सप्रेस इन या हॉटेल मध्ये राको कुटुंबीय गेले होते. त्यावेळी हॉटेलचे १५ रुपयांचे बिल देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे ते सर्व बिल न देताच निघून गेले. त्यानंतर २७ मे रोजी मीरा रोड येथील सीझन हॉटेलमध्ये रहायला गेले.
तेव्हा रात्रीच्या वेळी ब्रायन आणि पत्नी पुनमने त्यांच्या मुलीसह उंदीर मारण्याचे विषारी द्रव्य प्राशन केले. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास पूनमला जाग आली. तेव्हा ब्रायन रुममध्ये नव्हता आणि मुलगी बेशुद्ध झाली होती. या घटनेनंतर पूनमने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांची मदत घेवून काशिमिरा पोलिसांना संपर्क केला. त्यानंतर पूनम आणि मुलगी अनायकाला भाईंदरमधील टेंभा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी अनायकाला मृत घोषीत केले. ब्रायन आणि पूनमने रात्री हॉटेलच्या खोलीत विष घेतले होते. ब्रायनला जेव्हा जाग आली तेव्हा तो पत्नी आणि मुलीला त्याच अवस्थेत टाकून फरार झाला. ब्रायनचा पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली.
