भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या तुमसर येथील देव्हाडी मार्गावरील एका हॉटेल समोर एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा खून प्रेम प्रकरणातून झाल्याचे समोर आले आहे. खूनाचा हा थरार हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सचिन गजानन मस्के (वय ३४) रा. शिवाजीनगर तुमसर असे मृताचे नाव आहे. यात ३ आरोपींचा समावेश आहे. यातील २ आरोपींना अटक करण्यात आले आहे. मुख्य आरोपी फरार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीत कुलदीप मनोहर लोखंडे वय २७ वर्ष, चेतन दिलीप मदारकर वय २८ वर्ष दोन्ही रा. शिवाजी नगर तुमसर यांना अटक करण्यात आली आहे. तर रंजीत सहादेव गभने वय ३२ वर्ष रा.शिवाजी नगर तुमसर हा फरार झाला आहे. पुढील तपास तुमसर पोलीस करत आहेत.
तुमसर शहरातील देव्हाडी मार्गावरील हॉटेल प्रसादमध्ये सचिनसह तीन ते चार जण जेवन करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी गेले होते. जेवन आटोपून हॉटेलच्या बाहेर आले. तेव्हा त्यांच्या जून्या प्रेम प्रकरणाच्या कारणावरुन वाद झाला. दरम्यान, सचिन आपल्या दोन मित्रा सोबत दुचाकीने निघाला. यावेळी गाडी थांबवत आरोपी रंजीत गभने याने सचिनच्या पाठीवर व पोटावर तिक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. यात तो जागीच ठार झाला.
सचिन मृत्युमुखी पडल्याची खातरजमा होताच, सर्व आरोपींनी तेथून पळ काढला. या घटनेचा थरार हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान तुमसर पोलिसांनी दोन आरोपींला अटक केली असून, मुख्य आरोपी फरार आहे.
