कला केंद्रचालकाकडून महिलेला बेदम मारहाण; १२ वर्षांच्या मुलीला ठेवले डांबून

फुले शाहू आंबेडकर
0

बीड: आपल्या मुलीचे शिक्षण आणि तिचे लग्न व्हावे, यासाठी परिस्थितीशी दोन हात करत कला केंद्रावर काम करणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला कलाकेंद्र चालकाने बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. ही घटना बीड (Beed) जवळ घडली आहे. विशेष म्हणजे या महिलेला वायरने आणि पट्ट्याने मारहाण केली आहे. तिच्या बारा वर्षाच्या मुलीला डांबून ठेवण्यात आल्याचे देखील पीडितेने म्हटले आहे.

'आज सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेऊन तिने पोलीस (Police) अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. मात्र गेल्या १५ दिवसांपासून मी वणवण फिरते आहे, मात्र माझे कोणीच ऐकून घेत नाही. मला न्याय देत नाही', असं त्या महिलेने म्हटले आहे.

बीड - सोलापूर  या महामार्गावर असणाऱ्या उदंडवडगाव येथील कलाकेंद्रावर ३५ वर्षीय पीडिता गेल्या पाच वर्षांपासून काम करत आहे. यादरम्यान तिच्याकडून गाण्यावर डान्स करून घेतला जातो. मात्र तिच्याकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय देखील करून घेतला जात असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तर गेल्या एक तारखेला कला केंद्र चालकाने पीडितेला चक्क वायरने पट्ट्याने गंभीर मारहाण केली असल्याचे तिने सांगितले. यामध्ये पीडितेच्या पायावर, पाठीवर हातावर आणि संपूर्ण शरीरावर मोठमोठ्या जखमा देखील झाल्या आहेत. ' मला न्याय देण्यात यावा, माझ्या मुलीची सुटका करण्यात यावी, संबंधित कला केंद्र चालकांवर कारवाई करण्यात यावी,' अशी मागणी पीडित महिलेने केली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या मुसळे म्हणाल्या, पीडिता ही माझ्याकडे आली आणि तिने आपली आपबीती सांगितल्यानंतर मला धक्काच बसला. त्या कला केंद्र चालकाने एवढी अमानुष मारहाण केली. जे पाहून कोणाच्याही काळजाला पाझर फुटेल. सध्या तिची मुलगी त्या कला केंद्र चालकाच्या ताब्यात आहे. तिचे कोणी ऐकत नाही, तिची तक्रार कोणी घेतली नाही. त्यामुळे आज आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयात आलो आहोत.

प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन पीडितेला न्याय द्यावा. अशी मागणी मुसळे यांनी केली. तात्काळ त्या कला केंद्र चालकावर गुन्हा दाखल करून कारवाई केली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू. असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विलास बामणे यांनी दिला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असतानाच, आज पून्हा हा अमानुष मारहाणीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default