दोन दिवसानंतर‌ जळगावात पुन्हा खून एकाच महिलेशी प्रेमसंबंधातून खूनाचा संशय

फुले शाहू आंबेडकर
0
जळगाव : शहरात दोन दिवसांपूर्वी खून झाल्याची घटना ताजी असताना शनिवारी (२३ जुलै) पुन्हा हरीविठ्ठलनगरच्या भर चौकात एका तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला करुन खून  करण्यात आला आहे. घटनेनंतर गुन्हे शाखेचे कर्मचारी विजय पाटील यांनी घरात लपलेल्या संशयिताची गचांडी धरताच हल्लेखोर त्यांच्यावर चाल करुन आला. पोलिस असल्याचे सांगत त्याला ताब्यात घेत रामानंदनगर पोलिसांना  सोपवण्यात आले. एकाच महिलेशी दोघांचे प्रेमप्रकरण असल्याने त्यातूनच ही हत्या झाल्याचा संशय आहे. 
जळगाव  शहरातील गेंदालाल मिल परिसरातील तरुण रहिम शहा ऊर्फ रमा याचा दोन दिवसांपूर्वी जळकी मिल रेल्वे ट्रॅकजवळ खून करण्यात आला होता. या घटनेचे प्रकरण शांत होत नाही; तोवर शनिवारी हरिविठ्ठलनगर, गणपती मंदिर चौकात दिनेश भोई (वय २५) याचा खून करण्यात आला आहे. शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास हरिविठ्ठलनगरातील गणपती मंदिर बाजार पट्टा परिसरात लोखंडी रॉड, कोयत्याने दिनेश भोई (वय २५) याच्या डोक्यावर वार करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात  उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना रात्री ९.३० च्या सुमारास मृत्यू ओढवला.

पोलिसावरही उगारला रॉड

विठ्ठल ऊर्फ मावली हटकर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने दिनेश भेाई या तरुणाची हत्या केल्याचे वृत्त परिसरात वाऱ्यासारखे पसरले. संशयित परिसरातील एका घरातच लपल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी विजय शामराव पाटील यांना मिळाली. विजय पाटील यांनी साध्या कपड्यातच घटनास्थळ गाठले. विठ्ठल ऊर्फ मावली हटकर लपलेल्या घरात शिरताच त्याला मारायला कुणीतरी आले, या समजुतीने तोच लोखंडी रॉड विजय पाटील यांच्यावर उगारला. शिताफीने त्याचा वार चुकवत रॉडसह त्याला धरल्यावर गर्दी गोळा झाली. घटनेची माहिती कळताच गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले, प्रितम पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख घटनास्थळी धडकले संशयिताला ताब्यात घेत रामानंदनगर पोलिसांना सोपवण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default