माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यानंतर जिल्ह्यातील त्यांच्या काही समर्थकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. १८ डिसेंबर २०२१ ला भुसावळ येथे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा झाला होता. त्यावेळी दहा नगरसेवकांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे पुष्पाबाई रमेशलाल बत्रा यांनी या दहा नगरसेवकांना अपात्र करावे, म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे तक्रार दिली होती.
सदर तक्रारीनुसार जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही कडील बाजू ऐकून घेतल्या. त्यानंतर सोमवारी (ता. १८) भुसावळच्या दहा नगरसेवकांना १८ डिसेंबर २०२१ ते नगरपरिषदेच्या पुढील कार्यकाळापर्यंत अपात्र ठरविण्याचे आदेश दिले. या कारवाईमुळे भुसावळच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदारातर्फे ॲड. राजेंद्र राय, तर नगरसेवकांतर्फे ॲड. महेश भोकरीकर, ॲड. हरीश पाटील यांनी काम पाहिले.
अपात्र नगरसेवक
लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक अमोल इंगळे, लक्ष्मी मकासरे, सविता मकासरे, प्रमोद नेमाडे, मेघा वाणी, ॲड. बोधराज चौधरी, शोभा नेमाडे, किरण कोलते, शैलजा नारखेडे.
