सायकल चोरी प्रकरणी तक्रार खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली. त्यानंतर पोलिसांनी सायकल चोरीप्रकरणी तपास सुरू केला. त्यासाठी घटनास्थळावरील सीसीटीव्हीचा आधार घेतला. त्या सीसीटीव्हीत एक चोरटा आढळला. त्यानंतर पोलिसांनी त्या सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत आरोपीला कल्याण पश्चिम येथून अटक केली आहे. तसेच त्याकडून १४ सायकली असा एकूण १ लाख २७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण शहरात महागड्या सायकली चोरीचे प्रमाण वाढले होते. या संदर्भातील तक्रार खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल होताच कल्याणचे सहायक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील आणि खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या पथकांने सीसीटीव्हीच्या आधारे या प्रकरणाचा शोध सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी सायकल चोरीप्रकरणी आरोपी सायड्रीक एबीनिझर याला कल्याण पश्चिम येथील गुरुदेव हॉटेल येथून ताब्यात घेतले.तसेच अधिक तपास केला असता आरोपीने सायकली चोरी केल्याचे कबूल केले.
दरम्यान, पोलिसांनी आरोपीकडून तब्बल १ लाख २७ हजार किंमतीच्या १४ सायकली हस्तगत केल्या आहेत. तसेच या प्रकरणात आरोपीला मदत करणाऱ्या दोन अल्पवयीन बालकांचा देखील समावेश असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच आरोपीचा अजून कोणत्या गुन्ह्यात सहभाग आहे का याचा पुढील तपास पोलिस करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.
