औरंगाबादमध्ये वायर वीज प्रवाह असलेल्या वायरवर पडल्याने शॉक लागून चौघांचा मृत्यू झाला आहे. कन्नड तालुक्यातील हिवराखेडा नांदगीर वाडी या ठिकाणी सदर घटना घडली आहे. या घटनेत गणेश कारभारी थेटे (35) भारत बाबुराव वरकड (35) जगदीश मुरकुंडे( 40), अर्जुन वाळु मगर (26, सर्व रा. नावडी) या चौघांचा मृत्यू झाला. हे सर्वजण कन्नड तालुक्यातील नावडी येथील होते.
मिळालेल्या माहितीनुसार, हिवरखेडा नांदगीर वाडी या शिवारात गणेश थेटे, भारत वरकड, जगदीश मुरकुंडे, अर्जुन मगर हे चारजण नवीन विद्युत प्रवाहाचे काम करत होते. विद्युत पोल उभे केले होते. त्या पोलवर नवीन तार ओढण्याचे काम चालू होते. ज्या ठिकाणी हे तार ओढण्याचे काम सुरू होते, तिथे मात्र विद्युत प्रवाह नव्हता. 300 फूट अंतरावरुन एका शेतकऱ्यांनी केबल ( वायर) टाकून लाईट नेली होती. तार ओढत असताना ती तार नेमकी त्या वायरवर पडली.
तार ओढत असताना ती तार वायरला घासली आणि थ्रिफेजचा संपूर्ण विद्युत प्रवाह त्या तारेत उतरला. थ्रिफेजची फुल लाईट असल्याने या चार जणांचा काही सेकंदात जागीत मुत्यू झाला. नवीन विद्युत प्रवाहाच्या तार ओढण्याचे काम करताना अचानक विद्युत तारेत प्रवाह आल्याने या सर्वांचा मृत्यू झाला. ही बातमी गावात कळताच गावावर शोककळा पसरली.
