वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील मुळा नदी काठी मोकळ्या मैदानात मयत दीपक व अल्पवयीन आरोपी हे दोन वेगवेगळया ग्रुपमध्ये गटारी साजरी करण्यासाठी बसले होते. दुपारी दीपक याने अल्पवयीन आरोपीला तू माझ्या मित्राचा लहान भाऊ आहेस तू गुटखा, दारू व अन्य व्यसने करू नको असे म्हणत त्याच्या कानाखाली मारली. त्याने ही बाब अन्य मित्रांना सांगितली तेव्हा हे सर्वजण तिथून जाऊन सातच्या सुमारास वाकड गावठाण येथे थांबले. काही वेळाने दीपक येताच त्याच्यावर सर्वांनी हल्ला चढविला, सुरुवातीला त्याला दगड विटाने मारहाण झाली नंतर एकाने गाडीतील चाकु काढून दीपकच्या पोटावर वार केले. तर लखन याच्या डोके, हात आणि पोटावर वार करण्यात आले. याबाबत पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार खंडू उर्फ दीपक गायकवाड (वय. १९, रा. म्हातोबा नगर, वाकड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून लखन अंकुश लगस (वय. २२, रा. म्हातोबा नगर) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आदित्य थोरात (वय. १९, रा. पॉलरीस हॉस्पिटल जवळ वाकड) हा किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी सुमित सावंत (वय. २१, रा. सायकर चाळ, वाकड), अमोल देशमुख (वय २४, रा. शेडगे वस्ती, वाकड), अभिषेक उर्फ नंदू कांबळे (वय. २०), सुजित लोंढे (वय. १८, दोघेही राहणार वाकड गावठाण), आशिष भिसे उर्फ मर्फी (वय. वाकड चौक), ब्रम्हा जाधव (वय. २०), महेश जाधव (वय. २४, रा. दोघेही वाघमारे कॉलनी, दत्त मंदिर रोड, वाकड), सौरभ जाधव (वय. १८, रा. सुतारवाडी, पाषाण) यांच्यासह एका १६ वर्षीय अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अटक केली असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
