पप्पा, रडू नका अहो..आईच्‍या मृतदेहाजवळ बसून हुंदके देत मुलाकडून वडिलांचे सांत्वन

फुले शाहू आंबेडकर
0
मेहूणबारे : जामदा येथे सुनिताबाई यांचा मृतदेह येताच एकच टाहो फोडला. दोन्ही मुले आईचा मृतदेह पाहून आक्रोश करत होते. पाच वर्षांचा निरागस अन् गोंडस मुलगा नैतिक हा शव पेटीजवळ जाऊन आई-आई करत रडत होता.  त्यावेळी अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पत्नीचा मृतदेह पाहून पतीही रडत होता. मोठा मुलगा आपल्या पाच वर्षाच्या भावाला कडेवर घेत व हुंदके देत पप्पा रडू नका अहो, पप्पा रडू नका, असं सांगत होता. हे दृश्य बघून उपस्थितांचे डोळे पाणावले होते. 

जामदा येथील कोमलसिंग तिरसिंग राजपूत व त्यांची पत्नी सुनिता या जळगाव येथे पिंप्राळा भागात वास्तव्यास होते. मोठा मुलगा दिव्यराज हा १३ वर्षांचा असून, आठवीत तर लहान मुलगा नैतिक हा ५ वर्षांचा आहे.

१२ जुलैला कोमल राजपुत व त्यांची पत्नी सुनिता हे दोघे मुलगा दिव्यराज याला घेऊन दुचाकीवरून पिंपळनेर येथे सोडण्यासाठी जात होते. या दरम्‍यान नेर कुसंबाजवळ रस्‍त्यावरील ब्रेकरचा अंदाज न आल्याने सुनिताबाई ह्या गाडीवरून खाली पडल्या. यानंतर त्यांना तातडीने धुळे  येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

सुनिताबाई यांच्यावर उपचार सुरू असताना, त्या उपचारांना प्रतिसाद देत नव्हत्या. त्यामुळे त्यांना १४ जुलैला पुढील उपचारासाठी नाशिक येथे रवाना करण्यात आले. मात्र सुनिता राजपूत यांची पाच दिवस मृत्युशी झुंज सुरू असताना, १७ जुलैला त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर जामदासह परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर आज सोमवारी पहाटे जामदा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुले झाली पोरकी

सुनिताबाई यांची दोन्ही मुले दिव्यराज आणि नैतिक हे दोन्ही मुले आईच्या प्रेमाला पोरकी झाली. दोन्ही मुले हुंदके देत आम्हाला आमच्या आईकडे घेऊन चला असे म्हणत असताना अनेकांचे डोळे पाणावले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default