नाशिक रोड परिसरातील देवी चौकात मोबाईल दुकान फोडून चोरीची घटना समोर आली आहे विशेष म्हणजे बारा दिवसात याच दुकानात चोरीची ही दुसरी घटना असल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे दोन्ही चोरीच्या घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्या आहेत. नाशिकरोड येथील फोन सर्विस या मोबाईल दुकानात पुन्हा एकदा चोरट्याने हात साफ केल्याची घटना समोर आली आहे.
चोरी झाल्याने व्यवसायिकांमध्ये भीतीच वातवरण पसरले आहे. गेल्या 12 दिवसांपूर्वी याच दुकानात चोरट्याने दुकानाच्या वरील पत्रा फोडून आत प्रवेश करत चोरी केली होती.या घटनेत दुकानदाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. चोरी करताना तो सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता. पुन्हा त्याच पद्धतीने पुन्हा एकदा मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झाल्याचे समोर आले आहे.
यावेळी मात्र या चोरट्याने चोरी करताना तोंडावर पिशवी टाकून अनोखी शक्कल लढवत चोरी केली असल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून येत आहे.तर वाढत्या चोऱ्या लक्षात घेता पोलिसांनी गस्त वाढून घडलेल्या घटनेतील चोराला त्वरित बेड्या ठोकाव्यात अशी मागणी येथील व्यापारी करत आहेत.
दरम्यान एकाच दुकानात सारख्याच पध्दतीने दुसऱ्यांदा चोरी झाल्यामुळे या चोरांना पोलिसांचेच अभय तर नाही ना अशी चर्चा परिसरात सुरू आहे. वारंवार अशा चोरीच्या घटना घडत असल्याने व्यवसायिकांनाच आता पहारा देण्याची वेळ आली असून अशा चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता येथील व्यावसायिकांकडून जोर धरू लागली आहे.
