सुळे म्हणाल्या की, राज्यात मेरिटवर आलेले मोठ मोठे प्रकल्प इतरत्र जात आहेत. परराज्यात जाणाऱ्या या प्रकल्पांना काही मंत्रीच भेट देणार असल्याचे कळते आहे. मेरिटवर आलेले प्रकल्प बाहेर जात असल्याचे मोठे दुःख आहे. सत्ताधारी दिल्लीसमोर झुकण्यात धन्यता मानत आहेत. ते आज ज्या कृती करत आहेत, त्यामुळे त्यांना छत्रपतींचे नाव घेण्याचा अधिकार उरलेला नाही, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या तीन दिवसीय दौऱ्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी हा दौरा केला जात असल्याची टीका होत असल्याच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, राजकारणात आरोप करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मी १३ वर्षे खासदार आहे. किती दौरे केले याची माहिती सगळ्यांना आहे. विरोधकांना किमान माझ्यावर टिका करण्यासाठी काही मिळत आहे. ते त्यांना करू द्या. राज्यात येणाऱ्या प्रत्येकाचे अतिथी देवो भवः या उक्तीप्रमाणे स्वागत आहे.
वेदान्तानंतर मेडीसन डिव्हाईन पार्क बाहेर जात असल्याचे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे. याबद्दल त्या म्हणाल्या, राज्याचे हे मोठे दुदैव आहे. बेरोजगारी हे मोठे आव्हान आहे. दुसऱ्या राज्यात प्रकल्प जातो याचे दुःख नाही. पण आपला रोजगार हिरावला जात आहे. यासंबंधी आता राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक घ्यावी. नेतेमंडळींना सोबत घेत पंतप्रधानांची भेट घेत महाराष्ट्रावर होणारा अन्याय सांगावा. राज्यासाठी एकत्रित लढा देण्याची ही वेळ आहे.
