औरंगाबाद: पोलीस आयुक्तालयासमोर पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू; शेजाऱ्यांकडून होणाऱ्या छळाचा Video समोर
शुक्रवार, सप्टेंबर ०२, २०२२
0
औरंगाबाद: पोलीस आयुक्तालयाच्या पायऱ्यांवर स्वतःला पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेचं नाव सविता काळे असं आहे. 35 वर्षीय महिलेने औरंगाबाद येथील पोलीस आयुक्तालयासमोर स्वतःला पेटवून घेतलं होतं. ही खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास आयुक्तालयाच्या प्रवेशद्वाराजवळ घडली होती. दरम्यान पोलिसांनी तात्काळ धाव घेत महिलेच्या अंगावर कपडे टाकले. मात्र, महिला या घटनेत गंभीर जखमी झाली होती.
घटनेत 70 टक्के भाजलेल्या या महिलेचा आज पहाटे मृत्यू झाला. नवरा आणि शेजारी मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते. वारंवार पोलिसांत तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याचा आरोप या महिलेनं चिठ्ठी लिहून केला आहे. गंगापूर तालुक्यातील मांडवा या गावात ही महिला राहत होती.
महिलेला शेजारी राहणारे पती पत्नी सतत त्रास देत होते. याशिवाय शेजारच्या महिलेचं ऐकून पतीसुद्धा तिला मारहाण करत असे. शेजारी जोडप्याने पोलिसांचा धाक दाखवून आपल्यावर अत्याचार केला असाही आरोप या महिलेने केला होता. दरम्यान आता एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये महिलेला शेजारी राहाणारी एक महिला आणि तिचा पती मारहाण करत आहेत
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की एक पुरुष आणि महिला या महिलेला जबर मारहाण करत आहेत. यावेळी त्यांनी महिलेला रस्त्यावर पाडूनही मारहाण केली आहे. काही वेळात याठिकाणी अनेक लोक जमा झाल्याचे दिसतात मात्र तरीही महिलेला होणारी मारहाण थांबली नाही

