एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल, असा हा धक्कादायक प्रकार मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमधून उघडकीस आला आहे. बबलू असं मृत्युमुखी पडलेल्या शेजाऱ्याचं नाव असून याप्रकरणी पोलिसांनी पप्पू नामक आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी घरात मटण तयार करण्यावरून पप्पू आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाला. या वादातून पप्पूने पत्नीला मारहाण करण्यास सुरूवात केली. पती मारहाण करत असल्याने पत्नीने मदतीसाठी आरडाओरड केली
तिचा आवाज ऐकून शेजारी राहत असलेला बबलू नामक व्यक्ती मदतीसाठी धावला. मात्र, वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी का आला असं म्हणत, पप्पूने हातातील काठीने बबलूच्या डोक्यात वार केला. यामध्ये बबलू गंभीर जखमी झाला.
त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी पप्पू हा फरार झाला होता. पोलिसांनी तातडीने शोध घेत त्याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.
