सुनील नायडू (वय २१) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरातील नटवर पारेख कंपाउंड येथे सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
येथील मोकळ्या मैदानात काही मुले दिवाळी निमित्त फटाके फोडत होते. याच परिसरात राहणारे आरोपी अल्पवयीन मुले देखील यावेळी बाटलीमध्ये याठिकाणी फटाके फोडत होते. याचवेळी मयत इसम सुनील नायडू (वय २१) हा त्याठिकाणी आला.
सुनीलने या मुलांना बाटलीतून फटाके फोडण्यास मनाई केली. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की अल्पवयीन मुलांनी सुनीलला जबर मारहाण करत, त्याच्यावर चाकूने वार केले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, त्याला तत्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच, शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणात सहभागी असलेल्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर एक अल्पवयीन हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. अटक करण्यात आलेल्या मुलांची वय अनुक्रमे १४ आणि १५ असल्याचं समजतंय.
