खोट्या कागदपत्रांद्वारे घरकुलाचा निधी हडपला; खरा लाभार्थी अनभिज्ञ

फुले शाहू आंबेडकर
0
नंदुरबार : उमराणी (ता. धडगाव) येथील रहिवासी मात्र सध्या मध्य प्रदेशात वास्तव्यास असलेल्या रमेश सोन्या ठाकरे यांच्या नावाने बनावट कागदपत्रे करून  घरकुलांचा निधी दोनदा हडप केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या ठाकरे कुटुंबातील कुणालाही घरकुले मिळालेली नाहीत. मात्र त्यांनी  अनुदान घेतल्याचे सांगत गटविकास अधिकारी सी. टी. गोस्वामी यांनी त्यांना तुमच्याविरोधात फौजदारी गुन्हा का दाखल करू नये, अशी नोटीस काढली आहे.
सदर प्रकरणाचा ऊहापोह होताच अंगलट येऊ नये म्हणून धडगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सी. टी. गोस्वामी यांनी रमेश सोन्या ठाकरेसह सोन्या रेवला ठाकरे, दिलीप सोन्या वसावे, राज्या दाज्या ठाकरे, अशोक दाज्या ठाकरे, पिंट्या सोन्या ठाकरे व दाज्या रेवल्या ठाकरे या सात जणांना ४ नोव्हेंबरला नोटीस बजावली.

काहीच नाही, तरीही खाते

ज्याच्या नावाने निधी काढला आहे त्या रमेश ठाकरेकडे आधारकार्ड अन् रेशनकार्डही नाही. मात्र त्याच्या नावे खोटे कागदपत्रे तयार करून बॅंकेतही खोटे खाते उघडून रक्कम लाटण्याचा उद्योग नेमका कुणाच्या संमतीने झाला, ग्रामपंचायत ते जिल्हास्तरावरील यंत्रणेतील कोण यात सहभागी आहे याचा शोध घेण्याची मागणी संबंधितांनी केली आहे.

दोनदा रक्कम केली वर्ग

रमेश ठाकरे यांच्या खाते क्रमांक ३८४७६९५८९४ मध्ये २ जून २०२१ ला प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गवंडी प्रशिक्षण योजनेत एक लाख २० हजार रुपये शासकीय खात्यावर जमा झाले आहेत. त्यातील २० हजार एटीएमद्वारे काढण्यात आले. उर्वरित एक लाख ११० रुपये त्या खात्यावरून ०५१२०२६२५६६ या खात्यावर वर्ग करण्यात आले. त्यानंतर प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेत पुन्हा या खात्यावर पहिला हप्ता १५ हजार व दुसरा हप्ता ४५ हजार असे ६० हजार रुपये बोगस खात्यावर जमा झाले आहेत. त्यामुळे एकाच व्यक्तीचा नावे दोन वेळेस लाभ घेऊन निधी लाटला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default