अधीक्षक अभियंता किरण नागवकर आणि कार्यकारी अभियंता प्रताप मचीए, अशी लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, या दोनही अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडे दोन लाख रुपयांची मागणी केली होती. या दोघांनाही रंगेहाथ पकडण्यात आलं असून त्यांची रवानगी तुरूंगात करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात लाचखोरींच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. लाचखोर अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने फास आवळला आहे. एकीकडे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचा कारवाईचा धडाका सुरू असताना, पालघरच्या या दोन अधिकाऱ्यांनी कुणालाही न जुमानता दोन लाख रुपयांची लाच मागितली.
मात्र, तक्रारदार व्यक्तीची लाच देण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक पथकाला दिली. तक्रार प्राप्त होताच, लाचलुचपत पथकाने सापळा रचला. ठरलेल्या वेळात तक्रारदार १ लाख रुपये घेऊन या दोनही अधिकाऱ्यांकडे गेला. यावेळी दोघांनाही लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
