काही व्यक्तींसोबत घरात आई दिसल्याने संतापलेल्या मुलाने आईला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना दि. 24 एप्रिल रोजी वडली गावामध्ये घडली होती. दरम्यान, जखमी महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा शुक्रवारी मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात मुलाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन मुलांसह ही महिला वडली येथे वास्तव्यास होती. 24 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता महिलेची दोन्ही मुलं लग्नात नाचत होती. एका घरात त्यांची आई ही काही व्यक्तींसोबत दिसून आली. याचा राग येऊन मुलाने बाजूलाच ठेवलेली सळई उचलून आईला मारहाण केली. यात त्या जखमी झाल्या. त्यांना लागलीच रुग्णवाहिका बोलवून जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली
महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे प्राणज्योत मालवली. अखेर महिलेच्या भावाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून मयताच्या मुलाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.