तोंदे येथे बनावट खतांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर कृषी विभागाची धाड

फुले शाहू आंबेडकर
0
शिरपूर तालुक्यात अनेर नदी काठावरील तोंदे गावात एका किराणा दुकानाच्या गोदामातून बनावट खताची विक्री होत असल्याची तक्रार हातेड खु! येथील शेतकऱ्याने जळगाव व धुळे जिल्ह्यातील कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने अचानक धाड टाकून रासायनिक खतांचा बनावट साठा जप्त करून गोडाऊन सील केले आहे.तर या प्रकरणी थाळनेर पोलीस स्टेशनला तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कृषी विभागा च्या धडक कारवाईमुळे बनावट खते व बियाणे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये खडबळ उडाली आहे.
चोपडा तालुक्यातील हातेड ख! येथील शेतकरी किशोर पाटील यांनी एमओपी या खता च्या गुणवत्ते विषयी चोपडा कृषी विभागाकडे तक्रार केली होती.त्या प्रमाणे तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे व जिल्हा गुणवत्ता नियंत्रक अरुण तायडे यांनी प्रत्यक्ष तक्रारदार शेतकरी यांच्याकडे जावून पाहणी केली असता एमोपी  हे खत प्रथमदर्शनी बनावट असल्याचे आढळून आले
बनावट खताच्या गोण्या तोंदे येथील मंगलचंद झुंबरलाल जैन या व्यापाऱ्याने MOP खताच्या ०७ गोण्या १७०० रुपये दराने आणून दिल्या होत्या मात्र त्यांनी खत घेतल्याची पावती अथवा बिल दिले नव्हते असे तक्रारदार शेतकरी किशोर पाटील यांनी सांगितले. यावेळी कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी तक्रारदार शेतक-याला विश्वासात घेवून बनावट खताच्या पिशव्या व्यापाऱ्यास परत करण्यास सांगितले.शेतकरी किशोर पाटील खत परत करण्यास गेले असता त्यावेळी कृषी विभागाच्या पथकाने सापळा रचून संशयित सुरजमल मोहनलाल जैन यांच्या किराणा दुकानाच्या गोदामात छापा मारला यावेळी एमओपी (MOP) आयपीएल कंपनीच्या बनावट खताच्या ५० किलो वजन असलेल्या तब्बल ५७ बॅगा गोदामात आढळून आल्या.सदर बनावट खताच्या बॅगांवर विना बॅच नंबर व आयपीएल कंपनीची नक्कल केल्याचे आढळून आले.असली व बनावट बॅगेच्या रंग व छपाईमध्ये सुद्धा बरीच तफावत आढळून आली.साठ्याबाबत गोडाऊन मालकास विचारणा केली असता त्याने खताचा साठा कैलास वासुदेव पाटील रा.तोंदे यांचा असल्याचा सांगितला.
गोदाम मालक सुरजमल मोहनलाल जैन यांनी दिलेल्या कबुली जवाबावरुन कैलास वासुदेव पाटील यांनी सदरचे बनावट एमओपी (MOP) खत हे विक्रीसाठी आणले असल्याचे सिध्द झाले. त्यावरुन कैलास पाटील यास विचारणा केली असता बनावट खत हे किशोर शालीकराव पाटील रा.करवंद (ता.शिरपूर) यांनी बिगर बिलाचे दिले असल्याचे सांगत इतर उडवा उडवीची उत्तरे दिली त्यामुळे खत बनावाट असल्याची खात्री झाल्याने शासकीय पंच व गावातील व्यक्तींच्या समक्ष आयपीएल कंपनीच्या एमओपी खताचा नमुना नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.
कृषी विभागाच्या कारवाईत ९६,९००/- रुपयांचा बनावट खताचा साठा जप्त करण्यात येऊन त्याच गोडावूनमध्ये पंचासमक्ष सिलबंद करण्यात आला आहे.संशयितांनी संगनमताने शेतकऱ्याची व शासनाची फसवणूक केल्याने
धुळे जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक मनोजकुमार शिसोदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगलचंद झुंबरलाल जैन व कैलास वासुदेव पाटील दोघे रा.तोंदे (ता.शिरपूर)व किशोर शालिकराव पाटील रा.करवंद (ता.शिरपूर जि.धुळे) यांच्या विरुध्द भादंवि कलम- 420, 468 खत नियंत्रण आदेश 1985 मधील खंड 7, 8, 19(अ), 19 (क) (2) 19(क) (3) (6) 35 (1) (अ), 35 (1) (ब) व जिवनावश्यक वस्तु कायदा 1955 मधील कलम 3 (2) (ड), 7, 9, 10 नुसार थाळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकरी बांधवांनी बिलाशिवाय कुठलेही बियाणे किंवा खतांची खरेदी करु नये. कारण यामुळे आपली फसवणूक होवू शकते. त्यामुळे अशी कुठलीही फसवणूक होत असेल तर त्वरीत आपल्या क्षेत्रातील कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले आहे. 
सदर कारवाई नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ,धुळे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कुरबान तडवी व जळगांव जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक मनोज शिसोदे,जळगांव जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे जिल्हा,चोपडा तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे व शिरपूर तालुका कृषी अधिकारी योगेश गिरासे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default