लग्नात सप्तपदी घेण्यापूर्वी नवरदेवानं होणाऱ्या सासू सासऱ्यांकडे हुंड्यात बोलेरोची मागणी केली. बोलेरो हवीच, त्याशिवाय सप्तपदी घेणार नाही, असं म्हणत नवरदेव अडून बसला. मुलीकडच्या मंडळींनी त्याची समजूत काढण्याचे प्रयत्न केले. मात्र नवरदेव हट्ट सोडायला तयार नव्हता. त्याची 'गाडी' बोलेरोवरच अडकली होती. यावरुन वाद सुरू झाला. हळूहळू वाद वाढत गेला. परिस्थिती बिघडू लागली. मुलीकडच्यांनी नवरदेवाची धुलाई केली. ती पाहून त्याच्यासोबत आलेले वऱ्हाडी पळून गेले. यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूंना समजावलं आणि प्रकरण शांत केलं. राजस्थानच्या दौसामधील मंडावर इथे ही घटना घडली
नांगल गावात राहणाऱ्या निशाचा (२४) विवाह बेजुपाडामधील झुताहेडा राहणाऱ्या विजेंद्रसोबत (२८) ठरला होता. दोन्ही गावातलं अंतर ११ किलोमीटर इतकं आहे. सोमवारी संध्याकाळी सात वाजता विजेंद्रचं कुटुंब वरात घेऊन नांगल गावात पोहोचलं. रात्री नऊ वाजता सप्तपदीचा विधी होता. वधूकडच्यांनी विधींची तयारी केली.
लग्न मंडपात उत्साहाचं वातावरण होतं. थोड्याच वेळात सप्तपदीचा कार्यक्रम होता. त्याआधी विजेंद्रनं सासरच्या मंडळींकडे हुंड्यात बोलेरोची मागणी केली. मुलीकडच्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र विजेंद्र ऐकायला तयार नव्हता. विजेंद्र आणि त्याचे कुटुंबीय ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यानं वादाला सुरुवात झाली. यानंतर मुलीकडच्या मंडळींनी विजेंद्र आणि त्याचे काका पप्पूलाल मीणा यांची धुलाई केली. कपडे फाटेपर्यंत मारहाण झाली. वातावरण बिघडलेलं पाहून वऱ्हाडी मंडळींनी धूम ठोकली.
