वरूळ (ता.शिरपूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी अचानक भेट देत केंद्र आणि परिसरातील अस्वच्छतेबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांसह ग्रामसेविका यांची चांगलीच कानउघडणी केली
वरूळ येथील आरोग्य केंद्र सुरु होऊन वर्षे होत आले.या आरोग्य केंद्रात दोनच कर्मचारी आहेत.कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे परिसरातील रुग्णाची गैरसोय होत आहे.सुसज्ज इमारत परंतु कर्मचारी अभाव असल्याने आरोग्य केंद्र परिसरात काटेरी झुडूप तयार झाले आहेत.
तर आतील भागातील साहित्यावर धूळ जमा झाली आहे. अशा परिस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांनी भेट देत केंद्रातील अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त करत भेटी दरम्यान आवारातील व आरोग्य केंद्रातील अस्वच्छता असल्याबाबत नाराजी दर्शवित ग्रामसेवक प्रीतम पवार यांची कानउघडणी केली.
आरोग्य केंद्राची स्वच्छतेची ग्रामपंचायतीची जबाबदारी असून आपल्यावर कार्यवाही का करू नये असे ग्रामसेवक प्रीतम पवार यांना विचारणा केली. सरपंच नरेंद्र मराठे यांनी आरोग्य केंद्रावर पुरेसा कर्मचारी नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.
सर्व सुविधा उपलब्ध असून देखील कर्मचारी नसल्याने उपचार होऊ शकत नाही असे सांगितले.
यानंतर आरोग्य केंद्रातील सुविधा, बाह्यरुग्ण कक्ष, प्रसूती कक्ष, संदर्भातील पाहणी करत आरोग्य केंद्राकडे येणाऱ्या रस्ता व संरक्षण भिंत बांधणे बाबत १५ व वित्त आयोगातून सुविधा करावी अशी सूचना केली.
याप्रसंगी कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर, पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता जयश्री साळवे, सहाय्यक गट विकास अधिकारी सुवर्णा पवार, विस्तार अधिकारी आरे. जे. पावरा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्नकुमार जैन, वैद्यकीय अधिकारी दीपिका मोरे, आरोग्य सेवक प्रकाश वाघेला व अधिकारी हजर होते.
