भाजप नेते राधाकृष्ण विखे यांच्या अख्यारीत असलेल्या महसूल विभागातील अधिकाऱ्याची तक्रार थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अख्यारीत असलेल्या गृह विभागाकडे म्हणजेच, पोलिसांकडे झाल्याने यावर काय कारवाई होते, याची चर्चा संगमनेरमध्ये रंगली आहे.
सागर कोकणे याने दाखल केलेल्या तक्रारीत दहा फेब्रुवारीला रात्री तलाठ्याबरोबर झालेल्या प्रकार मांडला आहे. या तलाठ्याने मित्राला फुकट वाळू टाक. याशिवाय वीस हजार रुपयांची मागणी केली. यानंतर रात्रभर वाळू वाहतूक करत राहा. पैसे न दिल्यास ट्रॅक्टर धरून घेऊन जाईल आणि तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करेल. यानंतर तलाठ्याने मुंबईला डान्सबारमध्ये घेऊन चल आणि माझा जेवढा खर्च होईल तेवढा कर, न केल्यास तुझ्यावर वाळू तस्करीचा आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करेल, अशी धमकी या तलाठ्याने दिल्याचे तक्रारीत कोकणे याने म्हटले आहे.
तसेच संबंधित तलाठ्यांचा पैसे घेतानाचा व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे असल्याचा दावा तक्रारदार कोकणे याने केला आहे. आता संबंधित तलाठ्याविरोधात संगमनेर पोलीस काय कारवाई करणार आणि महसूल विभाग या प्रकाराची काय दखल घेणार, याकडे लक्ष लागले आहे. या तलाठ्याचा यापूर्वी देखील व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. तलाठी कार्यालयासाठी चोरून विजेचा वापर केल्याची तक्रार होती. यावर प्रांताधिकाऱ्यांनी शिस्तभंगाची कारवाई देखील केली आहे. मात्र ठोस अशी कारवाई या तलाठ्यावर होत नाही. हा तलाठी महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीतील असल्याचे सांगितले जाते. तालुक्यातील काही राजकीय कार्यकर्त्यांनीही या तलाठ्याला वरदहस्त असल्याची चर्चा आहे
