भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक -डॉ. बाबासाहेब आंबेडकर

फुले शाहू आंबेडकर
0
भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात.
आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले.
इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले. इ.स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो.इ.स. २०१२ मध्ये, "द ग्रेटेस्ट इंडियन" नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली आहे. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकसंस्कृतीत उभारली गेली आहेत.
सुरुवातीचे जीवन
बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी तर आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ होते. मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती.मालोजींना तीन मुलगे व एक मुलगी अशी चार अपत्ये होती. दोन मुलांनंतरच्या मिराबाई या मुलीचा जन्म झाला होता. तर इ.स. १८४८ च्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजींचे चौथे अपत्य होते. मालोजींचा पहिला मुलगा घरदार त्यागून संन्यासी झाला. दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यातच नोकरीस लागला. तिसरा मुलगा असलेल्या रामजींनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले व पुढे ते नॉर्मलची परीक्षाही उत्तीर्ण झाले.शिक्षण सुरू असताना रामजी इ.स. १८६६ च्या सुमारात वयाच्या १८व्या वर्षी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स ॲन्ड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. रामजी १९ वर्षांचे असताना त्यांचा विवाह १३ वर्षीय भीमाबाईंशी झाला. रामजी हे इंग्लिश बोलू शकत. ते नॉर्मल स्कूल (मॅट्रिक) उत्तीर्ण होते. पुढे रामजींनी ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये सुभेदार आणि सैनिकी शिक्षक म्हणून काम केले.रामजी व भीमाबाई या दांपत्याला सन १८९१ पर्यंत चौदा अपत्ये झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या चार मुली जगल्या. मुलांपैकी बाळाराम, आनंदराव व भीमराव (भिवा) ही तीन मुले हयात होती. भीमराव हा सर्वात लहान व चौदावे अपत्य होता
बालपण
रामजी ज्या पलटणीत होते ती पलटण इ.स. १८८८ मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते. या काळात १४ एप्रिल १८९१ रोजी महू (आताचे डॉ. आंबेडकर नगर) या लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईंच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. रामजींनी मराठी व इंग्रजी भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते. भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे १४वे व अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव भिवा असे ठेवण्यात आले, त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. आंबेडकरांचे कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार जातीचे आणि महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते. ('आंबडवे' या गावचा 'अंबावडे' असा चुकीचा उल्लेख अनेक ठिकाणी केला गेलेला आहे.)अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक-आर्थिक भेदभाव केला गेला.इ.स. १८९४ मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातल्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळील दापोली या गावातील कॅम्प दापोली वस्तीत परिवारासह राहू लागले. भीमराव वयाने लहान असल्यामुळे कॅम्प दापोली येथील शाळेत त्यास प्रवेश मिळाला नाही व भीमरावास घरीच अक्षर ओळख करून द्यावी लागली. इ.स. १८९६ मध्ये रामजींनी आपल्या कुटुंबासह दापोली सोडले व ते साताऱ्याला जाऊन तेथे राहिले. यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल या मराठी शाळेमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.या वर्षीच त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. त्यांच्या या स्थानांतरानंतर थोड्या कालावधीत इ.स. १८९६ मधे मस्तकशूल या आजाराने आंबेडकरांच्या आई भीमाबाईंचे निधन झाले, त्यावेळी आंबेडकर ५ वर्षाचे होते. त्यानंतर भीमासह व अन्य मुलांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी कठीण परिस्थितीत केले.
साताऱ्यात आल्यावर थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आंबेडकर कुटुंब राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. रामजींनी इ.स. १८९६च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूलमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. इ.स. १८९८ साली रामजींनी जीजाबाई नावाच्या विधवेसोबत दुसरे लग्न केले. साताऱ्यातील कॅम्प स्कूलमधील मराठी शिक्षण पूर्ण केल्यानंतर साताऱ्यातीलच सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी हायस्कूलमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.कोकणासह महाराष्ट्रातील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असत व त्यात शेवटी कर शब्द जोडण्याचा प्रघात आहे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव "सकपाळ" असतांना त्यांचे वडील रामजी यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी साताऱ्यातील गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे प्रतापसिंह हायस्कूल)मध्ये "आंबडवेकर" असे आडनाव नोंदवले.साताऱ्याच्या या शाळेत भीमरावांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले भीमरावांचे आंबडवेकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडनिडे वाटत असे म्हणून माझे आंबेडकर हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमरावांना सुचविले. त्यावर भीमरावांनी होकार दिल्यावर तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून त्यांचे आडनाव आंबडवेकरचे 'आंबेडकर' असे झाले.नोव्हेंबर १९०४ मध्ये भीमरावांनी इंग्रजी चौथीची परीक्षा उत्तीर्ण केली व यावर्षीच रामजी सकपाळ मुंबईला सहपरिवार गेले.
सुरुवातीचे शिक्षण
डिसेंबर १९०४ मध्ये रामजी सकपाळ सहपरिवार मुंबईला आले व तेथील लोअर परळ भागातील डबक चाळ (बदक चाळ) नावाच्या एका इमारतीच्या एका खोलीत राहू लागले.मुंबईमधे आल्यावर भीमराव हे एल्फिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेत जाऊ लागले, एल्फिन्स्टन हायस्कूलमधे जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते.कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली. इतर जातीतील लोकांच्या विरोधामुळे रामजींनी मुलांना सरकारी शाळेत शिकवण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर केला. शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे. त्यांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती जेव्हा त्यांना तहान लागत असे, तेव्हा शाळेतील पाणी पिण्याच्या भांड्याला किंवा पेल्याला स्पर्श करण्याची त्यांना परवानगी नव्हती. तेव्हा एखादा उच्च जातीतील व्यक्ती उंचीवरून त्यांच्या ओंजळीवर पाणी ओतत असे. आंबेडकरांसाठी हे काम बहुधा शिपाई करीत. शिपाई उपलब्ध नसेल तर त्यांना दिवसभर पाण्याविनाच रहावे लागत असे; नंतर त्यांनी आपल्या लेखनात या घटनेचे "शिपाई नाही, तर पाणी नाही" असे वर्णन केले आहे.शाळेत असतानाच इ.स. १९०६ मध्ये १४-१५ वर्षीय भीमरावांचे लग्न दापोलीच्या भिकू वलंगकर यांची ९-१० वर्षीय कन्या रामीबाई उर्फ रमाबाई यांच्याशी झाले.एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकत असताना भीमरावांना वर्गातील स्पृश्य जातींच्या मुलांपासून दूर बसावे लागे. हायस्कूलमधील अनेक शिक्षक त्यांच्याशी तिरस्काराने वागत असत.आंबेडकर हे आपल्या विद्यार्थी जीवनात दररोज १८ तास अभ्यास करत असत. इ.स. १९०७ साली भीमराव एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले.ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भीमराव आंबेडकरांच्या ज्ञातिबांधवांनी कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजी यांच्या अध्यक्षेखाली सभा भरवून भिवा रामजी आंबेडकरांचे कौतुक केले. एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळविणे एवढे दुर्मिळ होते की, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहीर सभा भरवण्यात आली होती. यावेळी केळुसकर गुरुजींनी स्वतः लिहिलेल्या मराठी बुद्धचरित्राची एक प्रत भीमरावांना भेट म्हणून दिली. हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच बुद्धांच्या शिकवणुकींची माहिती मिळाली व ते बुद्धाप्रती आकर्षित झाले.आर्थिक अडचणीमुळे रामजी सकपाळ भीमरावांना महाविद्यालयीन शिक्षण देऊ शकतील, अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली. भीमरावांची हुशारी पाहून महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी महाराजांनी त्यांना दरमहा रु.२५ची शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले. त्यानंतर ३ जानेवारी, इ.स. १९०८ रोजी भीमरावांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला.पुढे चार वर्षांनी इ.स. १९१२ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन बी.ए.ची पदवी संपादन केली आणि बडोदा संस्थानात नोकरीसाठी रूजू झाले. याच वर्षी १२ जानेवारी १९१२ रोजी त्यांना पहिला मुलगा यशवंत झाला. त्याच सुमारात २ फेब्रुवारी, इ.स. १९१३ रोजी मुंबईमध्ये त्यांचे वडील रामजींचे आजाराने निधन झाले. पुढे चार महिन्यांनी बडोदा नरेशांकडून प्रति महिने साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रयाण केले
उच्च शिक्षण
आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते.त्यांनी नोव्हेंबर, १८९६ ते नोव्हेंबर १९२३ अशा २७ वर्षांत मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. आंबेडकरांनी या दरम्यान बी.ए., दोनदा एम.ए., पी.एचडी., एम.एस्सी., बार-ॲट-लॉ आणि डी.एस्सी. या पदव्या मिळवल्या. १९५० च्या दशकात त्यांना एलएल.डी. आणि डी.लिट. या दोन सन्माननीय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्या.आंबेडकर हे त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते.
मुंबई विद्यापीठ
केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली. यानंतर निर्णयसागर छापखान्याचे मालक दामोदर सावळाराम यंदे यांनीही प्रयत्न केल्यावर महाराजांनी त्यांना जानेवारी १९०८पासून दरमहा रु. २५ची शिष्यवृत्ती देऊ केली. त्यानंतर ३ जानेवारी इ.स. १९०८ रोजी रामजींनी भीमरावांचे नाव मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रीव्हियसच्या वर्गात दाखल केले.भीमराव हे आंबेडकर घराण्यातील सर्वप्रथम महाविद्यालयीन विद्यार्थी झाले. या काळात रामजी डबकचाळ सोडून इंप्रूव्हमेंट ट्रस्टच्या (पोयबावाडी-परळ) चाळीत राहायला गेले. येथे भीमराव नियमित अभ्यास करत असे. महाविद्यालयात भीमरावांना इंग्लिश व फारसी विषयांत शेकडा ७५ पेक्षा जास्त गुण मिळत असे. तेथे इंग्लिशचे प्राध्यापक मुलर व फारसीचे प्राध्यापक के.बी. इराणी हे आंबेडकरांचे शिक्षक होते. आंबेडकर राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे मुख्य विषय घेऊन जानेवारी १९१३मध्ये बी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. ते मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची पदवी संपादन करणारे अस्पृश्य वर्गातील पहिले विद्यार्थी होते. महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक सहकार्यातून मुक्त व्हावे, असा विचार करून आंबेडकरांनी बडोदा संस्थानात नोकरी मिळवली व २३ जानेवारी १९१३ रोजी नोकरीवर रूजू झाले. पण नवव्या दिवशीच मुंबईत वडील आजारी असल्याची तार त्यांना मिळाली व दोन दिवसांनी ते मुंबईत आले. भीमरावांची वडिलांशी भेट झाल्यावर ३ फेब्रुवारी १९१३ रोजी रामजींचे निधन झाले. यानंतर ते बडोद्यातील नोकरीवर पुन्हा वेळेवर हजर होऊ शकले नाहीत. दरम्यान त्यांना पुढचे पदव्युत्तर शिक्षण घेण्याची व त्याकरिता अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली
कोलंबिया विद्यापीठ
कर, स्थानिक स्वराज्यसंस्थांचे कर तसेच प्रांतिक सरकारचे कर याची छाननी त्यावेळच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून केली. त्यानंतर आठ वर्षांनी (इ.स. १९२५ मध्ये) आंबेडकरांचा पीएच.डी.चा प्रबंध ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती या नावाने लंडनच्या पी.एस. किंग अँड कंपनीने ग्रंथरूपात प्रकाशित केला. आंबेडकरांनी प्रबंधाच्या प्रती कोलंबिया विद्यापीठात सादर केल्या, त्यानंतर ८ जून १९२७ रोजी आंबेडकरांना पीएच.डी. ही डॉक्टरेट पदवी रीतसर प्रदान करण्यात आली.आंबेडकरांचे पीएच.डी. पदवीसाठीचे मार्गदर्शक प्रा. सेलिग्मन यांनी ग्रंथाची प्रस्तावना लिहिली होती. कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्यानंतरही अनेक वर्षं सेलिग्मन यांच्याशी आंबेडकरांनी घनिष्ठ संबंध जोपासला होता. डॉ. आंबेडकरांनी आपला हा ग्रंथ महाराज सयाजीराव गायकवाड यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण केला.
९ मे १९१६ रोजी कोलंबिया विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ. ए.ए. गोल्डनवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या मानववंशशास्त्र विषयाच्या चर्चासत्रात कास्ट्स इन इंडिया : देअर मेकनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट (भारतातील जाती : त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी) नावाचा आपला एक नवीन शोधलेख वाचला. शास्त्रीय विवेचन केलेला हा शोधलेख मे १९१७ इंडियन अँटीक्वेरी नावाच्या मासिकात प्रकाशित झाला. नंतर हाच शोधलेख पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झाला. हे आंबेडकरांचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक होते.
कोलंबिया विद्यापिठामध्ये आंबेडकरांना जॉन ड्युई यांचेही मार्गदर्शन मिळाले. आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या कल्पनांनी डेव्ही सुद्धा प्रभावित झाले होते. आंबेडकरांनी या विद्यापीठात प्रथमच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता तत्त्वांचा अनुभव घेतला होता. "कोलंबिया विद्यापीठातील जॉन डेव्ही, जेम्स शॉटवेल, एडविन सेलिगमन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र येथे मिळाले", असे आंबेडकरांनी एका मुलाखतीत म्हटले होते. आंबेडकरांनी ३ वर्षांसाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा वापर करून अमेरिकेतील अभ्यासक्रम केवळ ३ वर्षांच्या आधी पूर्ण केला होता. लंडनला जाऊन अर्थशास्त्रामध्ये संशोधन करून अन्य पदव्या मिळवाव्यात ह्या विचाराने त्यांनी फेब्रुवारी १९१६ मध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांना दोन-तीन वर्ष शिष्यवृत्तीची मुदतवाढ मिळविण्यासाठी विनंतीपत्र पाठवले. मात्र ती विनंती अमान्य करण्यात आली. त्यानंतर आंबेडकर प्राध्यापक सेलिग्मन यांच्या शिफारसपत्रासह गायकवाडांना दुसरे विनंती पत्र पाठवले, मात्र यावेळी त्यांना केवळ एका वर्षाकरिता शिष्यवृत्तीची मुदत वाढवून देण्यात आली, मग मे १९१६ मध्ये ते लंडनला गेले
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन
आंबेडकरांनी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील आपल्या अभ्यासक्रम संपल्यावर पुढील शिक्षण लंडन मध्ये करण्याचे ठरवले. इ.स. १९१६ च्या जून महिन्यात ते लिव्हरपूल बंदरात उतरले व पुढचा प्रवास रेल्वेने करत लंडनला पोहोचले. कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक सीगर यांनी लंडन विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन कॅनन यांना आंबेडकरांसाठी परिचयपत्र दिले होते. "डॉ. भीमराव आंबेडकरांची अर्थशास्त्रातील प्रगती एखाद्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकापेक्षाही जास्त आहे" असे त्या परिचयपत्रात सीगर यांनी लिहिले होते.तसेच प्रा. सेलिग्मन यांनीही अर्थशास्त्रज्ञ सिडने वेब यांच्या नावे परिचयपत्र आंबेडकरांजवळ दिले होते, ज्यात आंबेडकरांना अर्थशास्त्राच्या विविध ग्रंथांचा अभ्यास करता यावा म्हणून लंडन येथील विविध ग्रंथालयात प्रवेश मिळवून द्यावा असे सांगितले होते. त्यानुसार वेब यांनी लंडनमधील इंडिया हाऊसच्या ग्रंथालयात आंबेडकरांना अभ्यास करता येईल अशी सोय उपलब्ध करून दिली. अर्थशास्त्रामध्ये पदव्या घेण्याच्या हेतूने इ.स. १९१६ च्या ऑक्टोबर महिन्यात आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये प्रवेश घेतला. कोलंबिया विद्यापीठात एम.ए. व पीएच.डी. या पदव्यांसाठी आंबेडकरांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता, त्यामुळे बी.एस्सी.ची परीक्षा न देता थेट एम.एस्सी. साठी प्रवेश मिळावा, अशी प्रा. कॅनन यांच्या शिफारशीसह असलेली विनंती लंडन विद्यापीठाने मान्य केली.हा अभ्यास सुरू असतानाच समांतर बॅरिस्टर होण्यासाठी ११ नोव्हेंबर १९१६ रोजी लंडनमधील ग्रेज इन मध्ये प्रवेश घेतला. एम.एस्सी. पदवी मिळवण्याकरिता प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स (भारतीय शाही अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) विषयावर प्रबंध लिहिणे सुरू केले. परंतु त्यांच्या एक वर्ष शिष्यवृत्तीची कालमर्यादा संपल्यामुळे अभ्यास अर्धवट सोडून त्यांना भारतात परतावे लागले. लंडन सोडण्यापूर्वी आंबेडकरांनी पुढील चार वर्षांच्या कालमर्यादेत म्हणजे ऑक्टोबर १९१७ ते सप्टेंबर १९२१ पर्यंत कोणत्याही वेळी लंडन येऊन आपला अपूर्ण राहिलेला अभ्यास करण्यासाठी पुन्हा प्रवेश घ्यावा, अशी लंडन विद्यापीठाकडून परवानगी मिळवली होती.
नसून सतत अभ्यास करणे, हे त्यांचे ध्येय होते.वर्षभरात आंबेडकरांनी त्यांचा शोधप्रबंध प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया (ब्रिटिश भारतातील साम्राज्यीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) तयार केला आणि जून १९२१ मध्ये एम.एस्सी.च्या पदवीसाठी लंडन विद्यापीठात सादर केला. विद्यापीठाने प्रंबंध स्वीकारून २० जून १९२१ रोजी त्यांना अर्थशास्त्रातील एम.एस्सी. ही पदवी प्रदान केली. २८ जून १९२२ रोजी ग्रेज-इन संस्थेने त्यांना बॅरिस्टर-ॲट-लॉ (बार-ॲट-लॉ) ही कायद्याची उच्चतम पदवी प्रदान केली. त्यानंतर 'द प्रोब्लम ऑफ रुपी' (रुपयाचा प्रश्न) हा अर्थशास्त्रीय प्रबंध तयार करून 'डॉक्टर ऑफ सायन्स' (डी.एस्सी.)च्या पदवीसाठी ऑक्टोबर १९२२ मध्ये लंडन विद्यापीठात सादर केला. त्यांनतर, अर्थशास्त्रावर संशोधनात्मक लेखन करून जर्मनीच्या बॉन विद्यापीठाचीही डॉक्टरेट पदवी मिळवावी हा विचार करून ते जर्मनीला गेले आणि बॉन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. ते जर्मन भाषाही शिकलेले होते. तेथे तीन महिने राहून त्यांनी प्रबंधलेखनाची तयारी केली. त्याचवेळी शिक्षक एडविन कॅनन यांनी डी.एस्सी. पदवी संदर्भात लंडनला येण्यासंबंधीचे पत्र त्यांना पाठवल्यामुळे ते लगेच लंडनला परतले.प्रबंधात आंबेडकरांनी भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या धोरणांवर टीका केलेली असल्यामुळे मार्च १९२३ मध्ये परीक्षकांनी स्वतःच्या प्रबंधाचे त्यांच्या धोरणानुसार पुनर्लेखन करण्याचे सांगितले. यासाठी तीन-चार महिन्यांचा कालावधी लागणार होता. यादरम्यान त्यांच्याजवळील पैसे संपत चालले होते म्हणून त्यांनी भारतात जाऊन तेथे प्रबंध पूर्ण करण्याचे ठरवले. त्यांनी बॉन विद्यापीठाचा प्रबंध सोडून दिला. आंबेडकर लंडनहून बोटीने भारताकडे निघाले व ३ एप्रिल १९२३ रोजी ते मुंबईला पोहोचले. ऑगस्ट १९२३ मध्ये आंबेडकरांनी आपले निष्कर्ष न बदलता लिखाणाची पद्धत बदलून प्रबंध लंडन विद्यापीठाला पुन्हा एकदा पाठवला. विद्यापीठाने तो प्रबंध मान्य करत नोव्हेंबर १९२३ मध्ये त्यांना डी.एस्सी.ची पदवी प्रदान केली.[्लडनच्या पी.एस. किंग अँड कंपनी प्रकाशन संस्थेने द प्रोब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध इ.स. १९२३ च्या डिसेंबर मध्ये ग्रंथरूपाने प्रसिद्ध केला. या ग्रंथाला त्यांचे मार्गदर्शक अर्थशास्त्रज्ञ डॉ. कॅनन यांनी प्रस्तावना लिहिली होती. हा प्रबंध आंबेडकरांनी आपल्या आई-वडिलांस अर्पण केला होता या संशोधनांमुळे तसेच ग्रंथलेखनामुळे अर्थशास्त्र व राज्यशास्त्र ज्ञानशाखांतील तज्ज्ञ व्यक्ती तसेच निष्णात कायदेपंडित म्हणून आंबेडकर ओळखले जाऊ लागले.इंग्लंडमध्ये शिकत असताना ज्या अभ्यासक्रमाला ८ वर्षे लागतात तो आंबेडकरांनी २ वर्षे ३ महिन्यांत यशस्वी तऱ्हेने पूर्ण केला होता. यासाठी त्यांना दररोज २४ तासांपैकी २१ तास अभ्यास करावा लागला
जातिसंस्था विषयक सिद्धान्त
अमेरीकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये १९१६ साली डॉ. ए.ए. गोल्डनविझर यांनी मानववंशशास्त्र विषयक परिसंवादात भाग घेण्यासाठी भीमराव आंबेडकरांना बोलविले. त्यांनी भारतातील जाती, त्यांचा उगम, विकास आणि वास्तविकता या विषयावर व्याख्यान दिले. तेव्हा आंबेडकर हे केवळ २५ वर्षांचे होते.[६६] आंबेडकरांनी या आपल्या शोध पुस्तिकेत जातिसंस्था विषयक खालील सिद्धांत मांडले.
वर्ग आणि जात तसे मानायचे झाले, तर निकटवर्ती होत. कालांतराने ते अलग होतात. बंदिस्त केलेली, गोठवलेला वर्ग म्हणजे ‘जात
जातिसंस्था मनूने निर्माण केली हे डॉ. आंबेडकरांना मान्य नव्हते. आंबेडकरांच्या मतानुसार, 'मनूने जातीचा कायदा सांगितला नाही. तो ते करू शकता नव्हता. मनूपूर्वी कित्येक वर्षे जातिसंस्था अस्तित्वात होत्या. स्मृतिकार मनूने अस्तित्वात असलेल्या कायद्यांची संहिता बनवून, त्याला तात्त्विक आणि धार्मिक अधिष्ठान प्राप्त करून दिले.'
४ जानेवारी १९२८ रोजी द टाइम्स ऑफ इंडियाच्या इंदूर संस्थानात अनुसूचित जातींना मिळणाऱ्या वाईट वागणुकीबद्दलच्या वृत्तांताची तुलना आंबेडकरांनी १८ व्या शतकातील पेशवाईतील रिजनाच्या स्थितीशी केली.
आंबेडकरांनी जात या संकल्पनेची चिकित्सा करून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
जात ही श्रमविभागणी वरही अवलंबून नाही आणि नैसर्गिक कल वा योग्यतेवरही अवलंबून नाही. व्यक्तीची कामे जात आधीच तयार करते. कूळ कुवतीच्या आधारे नव्हे तर, जन्मानुसार किंवा आई-वडिलांच्या सामाजिक स्थानानुसार ठरते
वकिली
आंबेडकर १९२२ मध्ये ग्रेज इन येथून बॅरिस्टर-ॲट-लॉ ही पदवी घेउन ३ एप्रिल, १९२३ रोजी मुंबईत परतले. समाजकार्य करावे व अर्थाजनासाठी वकिली करावी असा निर्णय त्यांनी घेतला व परळच्या दामोदर हॉलमध्ये पहिल्या मजल्यावर एक खोली कार्यालयासाठी मिळवली. जून महिन्यात त्यांनी वकिलीच्या प्रॅक्टिससाठी मुंबई उच्चन्यायालयात आपले नाव नोंदवण्यासाठी अर्ज दाखल केला व ५ जुलै, १९२३ रोजी उच्च न्यायालयाने त्यांचे नाव नोंदवून घेतले. वकिली सुरू झाल्यावर आंबेडकर अस्पृश्य समाजाचे असल्याने स्पृश्य समाजाच्या वकिलांनी त्यांना सहकार्य करण्याचे टाळले. अशा स्थितीत बाळकृष्ण गणेश मोडक नावाच्या एका स्पृश्य वकीलाने आंबेडकरांना वकिली करत राहण्यासाठी सहकार्य केले.
आंबेडकरांना पहिली केस म्हणून नाशिक जिल्ह्यातल्या आडगावच्या महार जातीच्या जाधव बंधूंची केस मिळाली. ही केस वर्षभर चालली व यशस्वीही झाली. केसची फी म्हणून आंबेडकरांना सहाशे रुपये मिळाले.वकिलीतून घरखर्च भागत नसल्यामुळे त्यांनी बॉटलीबॉईज अकौंटसी इन्स्टिट्युटमध्ये मर्कंटाइल लॉचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. याचे त्यांना महिन्याला दोनशे रुपये वेतन मिळे. ही प्राध्यापक पदाची नोकरी त्यांनी १० जून, १९२५ ते ३१ मार्च, १९२८ पर्यंत केली.
आंबेडकरांनी अनेक महत्त्वपूर्ण खटल्यात सहभाग घेतला होता. ब्राह्मणेत्तर सत्यशोधक चळवळीशी संबंधित नेते केशव गणेश बागडे, केशवराव मारुतीराव जेधे, रांमचंद्र नारायण लाड आणि दिनकरराव शंकरराव जवळकर या चौघांवर "देशाचे दुश्मन" हे पुस्तक लिहिण्याच्या कारणांवरून खटला भरण्यात येऊन खालच्या न्यायालयाने त्यांना दोषी मानले होते. आंबेडकरांनी त्यांची अपील लढवून ऑक्टोबर १९२६ मध्ये त्या चौघांनाही वरच्या न्यायालयातून निर्दोष मुक्तता मिळवून दिली. फिर्यादीच्या बाजूने पुण्यातील वकील एल.बी. भोपटकर होते.
इंडिया अँड चायना या पुस्तकाचे लेखक फिलीफ स्प्रॅट यांनाही आंबेडकरांच्या वकिलीनिशी २८ नोव्हेंबर, १९२७ रोजी न्यायालयाद्वारे दोषमुक्त करण्यात आले. बॅरिस्टर आंबेडकरांची यशस्वी वकिलांमध्ये गणना होऊ लागली.
शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील व्यापारी चंदुलाला सरूपचंद शहा यांच्याविरुद्ध १९३० च्या इंडियन पिनल कोडच्या कायद्याखाली बेकायदा शस्त्रे आणि स्फोटके बाळगल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असताना शहा यांचे वकील प्रभाकर रेगे यांनी या गुन्ह्यातून तुम्हाला सोडवणे आपणास शक्य नसल्याचे सांगितला व दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये राहणाऱ्या डॉ. आंबेडकरांना भेटण्याचे सांगितले. पुढची तारीख कोणती आहे हे विचारून डॉ. आंबेडकरांनी त्यांचे वकीलपत्र स्वीकारले. त्यांनी ठाणे येथे सत्र न्यायालयात शस्त्र कायद्याप्रकरणी न्यायाधीशांसमोर दोनच मिनिटे युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर न्यायाधीशांकडून चंदुलाल शेठ यांना आरोपातून निर्दोष सोडवण्यात आले. यासाठी आंबेडकरांनी फक्त ठाणे-दादर रेल्वेचे तिकीट हेच मानधन घतेले होते. सन १९३० ते १९३८ या कालावधीत शहापूर येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात वकील म्हणून अनेक खटले आंबेडकर यांनी चालवले. वाशिंद येथील नाना मलबारी यांच्या घरी डॉ. आंबेडकर आले असताना ते ज्या लाकडी खुर्चीवर बसले होते ती खुर्ची त्यांनी आजपर्यंत जपून ठेवली आहे. आता ती खुर्ची कासने येथील विहारात मलबारी यांनी दान केलेली आहे.
२०२३ मध्ये, बाबासाहेब आंबेडकरांच्या वकिली कारकीर्दीस १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, संविधान दिनी २६ नोव्हेंबर २०२३ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर आंबेडकरांविषयी एक विशेष विभाग जोडण्यात आला. ज्यामध्ये त्यांच्या जीवनाचे तपशील, त्यांनी युक्तिवाद केलेले खटले, त्यांच्या महत्त्वाच्या भाषणांच्या लिंक्स (त्याच्या CAD भाषणाच्या ऑडिओसह), फोटो इत्यादी बाबी आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default