वर्षी (ता. शिंदखेडा) येथील संजय निंबा कोळी यांची पुतणी लीना ज्ञानेश्वर कोळी (वय ९) ही बालिका ३ ऑगस्ट २०२१ ला गावातील खालची भिलाटी भागात काकडी विकण्यासाठी गेली होती. त्यावेळी प्रकाश भीमराव पांचाळ याने तिच्याकडून दहा रुपयांची काकडी घेतली.
मात्र, पैसे दिले नाहीत. तसेच लीनाला मारहाण केली. ही बाब तिने काका युवराज मंडाले यांना सांगितली. त्यानंतर काका युवराज व लीना असे दोघे प्रकाश पांचाळ याच्याकडे गेले व जाब विचारला. ही माहिती संजय निंबा कोळी व विजय निंबा कोळी या दोघांना समजल्यावर ते दोघेही त्याठिकाणी पोचले.
त्यावेळी प्रकाश पांचाळ हा लोखंडी पास घेऊन युवराज मंडाले यांच्या अंगावर धावून आला. तसेच विशाल पांचाळ व मुकेश पांचाळ या दोघांनी संजय कोळी यांना जबर मारहाण करून जमिनीवर आपटले. विशाल याने संजय कोळी यांच्या छातीवर बसून त्यांचे डोके जमिनीवर आपटले.
या मारहाणीत संजय कोळी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी युवराज मंडाले यांच्या फिर्यादीवरून प्रकाश पांचाळ, विशाल पांचाळ व मुकेश पांचाळ या तिघांविरुद्ध नरडाणा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याचा तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज ठाकरे यांनी करून जिल्हा व सत्र न्यायालयात तिघांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले
अखेर तिघांना शिक्षा
हा खटला जिल्हा सत्र न्यायाधीश डी. एम. आहेर यांच्या न्यायालयासमोर चालला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. देवेंद्रसिंह तंवर यांनी कामकाज पाहिले. त्यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार युवराज मंडाले, विजय मंडाले, बाल साक्षीदार लीना कोळी यांच्यासह एकूण आठ साक्षीदार तपासले. या खटल्यात अॅड. तंवर यांनी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या विविध खटल्यांचे दाखले देऊन युक्तिवाद केला.
शिवाय, मृत संजय यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे न्यायालयाच्या लक्षात आणून दिले. कामकाजाअंती न्यायाधीश आहेर यांनी विशाल पांचाळ व मुकेश पांचाळ या दोघांना दोषी ठरवून त्यांना प्रत्येकी आठ वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
तर प्रकाश पांचाळ याला भांदवि कलम ३५२ अन्वये दोषी ठरवून तीन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच घटनेतील मृत संजय कोळी यांच्या परिवारास चौकशी करून योग्य ती नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला दिले. या खटल्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज ठाकरे, पैरवी अधिकारी साहेबराव मोरे यांचे सहकार्य लाभले.
