कोल्हापूर/ प्रतिनिधी
कोल्हापूर–सांगली जिल्हा सीमेवर मध्यरात्री थरारक दरोड्याची घटना घडून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असतानाच, कोल्हापूर पोलिसांनी अवघ्या 12 तासांत ‘सुपरफास्ट’ कारवाई करत दरोड्याचा संपूर्ण गुन्हा उघड केला आहे. खासगी आराम बसवर कोयत्याचा धाक दाखवून 1 कोटी 22 लाख रुपयांचा मुद्देमाल लुटणाऱ्या सात जणांच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, संपूर्ण सोने, चांदी व मोबाईलचे स्पेअर पार्ट्स हस्तगत करण्यात आले आहेत.
मध्यरात्रीचा थरार… बसवर दहशत
ही धक्कादायक घटना 22 डिसेंबर 2025 रोजी रात्री साडेअकरा ते बाराच्या दरम्यान घडली. कोल्हापूरहून मुंबईकडे निघालेल्या एका खासगी आराम बसमध्ये पार्सलद्वारे मौल्यवान दागिने आणि साहित्य नेले जात होते. याचाच सुगावा लागलेल्या दरोडेखोरांनी आधी बसचा पाठलाग केला. जिल्हा सीमेवरील निर्मनुष्य ठिकाणी बस अडवत दरोडेखोरांनी क्षणातच आपला डाव टाकला.
क्लिनरच्या गळ्याला कोयता लावून बस थांबवण्यास भाग पाडले, तर चालकाला बेदम मारहाण करत संपूर्ण बसमध्ये दहशत पसरवली. काही मिनिटांतच त्यांनी 1 कोटी 22 लाख रुपयांचे सोने, चांदी आणि मोबाईल स्पेअर पार्ट्स लुटून घटनास्थळावरून पोबारा केला.
पोलिसांची तपासयंत्रणा ‘ॲक्शन मोड’वर
घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांसह विशेष तपास पथके तातडीने तयार करण्यात आली.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांकडून मिळालेली गोपनीय माहिती यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित झाली.
मुख्य आरोपी जाळ्यात; टोळी उघड
या तपासात अक्षय कदम (रा. विक्रमनगर, कोल्हापूर) हा मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. कसून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या सहा साथीदारांची नावे उघड केली. त्यानंतर पोलिसांनी सलग छापेमारी करत सातही आरोपींना अटक केली.
संपूर्ण मुद्देमाल जप्त
पोलिसांच्या कारवाईत दरोड्यातील संपूर्ण सोने, चांदी आणि मोबाईलचे सुटे भाग जप्त करण्यात आले आहेत. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केलेला हा दरोडा पोलिसांच्या चातुर्य, वेगवान तपास आणि अचूक माहिती यामुळे काही तासांतच उघडकीस आला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही यशस्वी कारवाई पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रकरणाचा पुढील तपास वडगाव पोलीस करत आहेत.
नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव
अवघ्या 12 तासांत कोट्यवधींच्या दरोड्याचा उलगडा केल्यामुळे कोल्हापूर पोलिसांचे सर्वत्र जोरदार अभिनंदन होत आहे. गुन्हेगार कितीही नियोजनबद्ध असले, तरी कायदा आणि पोलिसांची नजर चुकवता येत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
